पारोळा – दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)पारोळा शहरातील युवा नेतृत्व तथा श्री भवानी गड संस्थानचे अध्यक्ष मोहित मंगेश तांबे हे आज १ नोव्हेंबर रोजी आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे,मोहित तांबे यांचे वडील मंगेशअण्णा तांबे हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असून, मुलगा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
लहानपणापासून राजकीय व सामाजिक वातावरणात वाढलेले मोहित तांबे हे सामाजिक, धार्मिक तसेच विविध युवा उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. आमदार अमोलदादा पाटील यांच्याशी असलेले कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांच्या नेतृत्वाविषयी असलेला आदर या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे, कमी वयातच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याच्या मोहित तांबे यांच्या संघटनात्मक क्षमतेची मागील नगरपालिका निवडणुकीदरम्यान चर्चा झाली होती.
त्यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत पक्षाने त्यांना नेतृत्वाची संधी देण्याचा निर्णय घेतला असून,आगामी काळात त्यांच्यावर पक्षातील महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविण्याचेही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.याबाबतची अधिकृत घोषणा १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.