जळगाव – दि.२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ऑर्किड नेचर फाऊंडेशन, जळगाव या संस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धन क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून अखंडपणे योगदान देणारे वन्यजीव अभ्यासक व पक्षीमित्र अभय उजागरे यांना ‘पर्यावरण मित्र पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासदांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष आर. ए. पाटील, कोषाध्यक्ष नितीन अट्रावलकर, सचिव सुनीता महाजन आणि सहसचिव माधुरी कोल्हे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व सभासदांनी सभेत सक्रिय सहभाग घेतला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
ऑर्किड नेचर फाऊंडेशनतर्फे दरवर्षी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘पर्यावरण मित्र पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. यंदा पर्यावरण संरक्षणासाठी गेल्या पाच दशकांपासून सातत्याने कार्य करणारे वन्यजीव अभ्यासक व पक्षीमित्र अभय उजागरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष आर. ए. पाटील, कोषाध्यक्ष नितीन अट्रावलकर, सचिव सुनीता महाजन आणि सहसचिव माधुरी कोल्हे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सभेला संस्थेचे माजी अध्यक्ष किशोर महाजन यांच्यासह शेगाव येथून आलेले प्रल्हाद साबे, नानासाहेब वाघ, दिलीप भारंबे, उषा शर्मा, अर्चना अट्रावलकर, अर्चना उजागरे, शशिकांत पाटील आणि श्री. गोसावी उपस्थित होते. सुनील पवार, प्रल्हाद साबे आणि गिरीश भावसार यांनी मनोगते व्यक्त केली.
सभेच्या प्रारंभी चहापान, तर समारोपानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि निसर्ग संरक्षणाच्या कार्याला नवी ऊर्जा देत ही वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.