यावल – (प्रतिनिधी ) दि.३ जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एक खळबळजनक आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील आशा नगर परिसरात घरगुती कारणावरून झालेल्या वादातून एका पतीने आपल्या नवविवाहित पत्नीचा गळा आवळून खून केला. लग्नाला अवघे सात महिने झालेले असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी यावल पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित पतीला ताब्यात घेतले आहे.
लग्नाला झाले होते अवघे ७ महिने
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यावल येथील आशा नगर भागात ही घटना घडली. मृत विवाहिता आणि आरोपी पती यांचा विवाह अवघ्या सात महिन्यांपूर्वी झाला होता. लग्न झाल्यापासूनच दोघांमध्ये काही घरगुती कारणां वरून सतत खटके उडत होते व त्यांच्यात अनबन सुरू होती.
सोमवारी दि.२ रोजी संध्याकाळच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
आरोपी पती अटकेत
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी पती फरदीन खान आरिफ खान याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून, घरगुती वादाचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेत आहेत.