Tuesday, November 3, 2026
Homeजळगांव शहरदिवाळीनिमित्त उद्यमी महिला पतसंस्था आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने‘अमृतपेठ–थेट बाजारपेठ’ विक्री प्रदर्शनाला...

दिवाळीनिमित्त उद्यमी महिला पतसंस्था आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने‘अमृतपेठ–थेट बाजारपेठ’ विक्री प्रदर्शनाला प्रारंभ.. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन; महिला उद्योजकांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ

  • जळगाव – दि. ३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना विविध गृहउपयोगी वस्तूंची खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देतानाच महिला उद्योजक व स्थानिक व्यावसायिकांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने उद्यमी महिला पतसंस्था आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण सभेत आयोजित करण्यात आलेल्या ३०,३१,ते १ नोव्हेंबर अश्या तीन दिवसीय ‘अमृतपेठ–थेट बाजारपेठ’ विक्री प्रदर्शनाचा शुभारंभ शुक्रवारी दि. ३०  रोजी सकाळी ११ वा.जळगावच्या महापौर सौ.दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी सुरू राहणार आहे.

या कार्यक्रमाला नगरसेविका सुचिता हाडा, उद्यमी महिला पतसंस्थेच्या चेअरमन पद्मजा अत्रे, व्हाइस चेअरमन मनीषाताई खडके, कार्यकारी व्यवस्थापकीय संचालिका प्रीती गुजराती, तज्ज्ञ संचालिका स्नेहा भूसारी, रेवती शेंदुर्णीकर आणि संस्थापक संचालिका हेमा अमळकर ,मीना जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते दीपपूजन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी पद्मजा अत्रे यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेला सातत्याने सहकार्य करणाऱ्या नगरसेविका सुचिता हाडा यांचाही सत्कार करण्यात आला.

महिला उद्योजक व्यावसायिक यांना प्रोत्साहन देणारा उपक्रम – महापौर काळे.. 

यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी उद्यमी महिला पतसंस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अशा प्रदर्शनांमुळे महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होते. त्यांच्या व्यवसायाला चालना मिळून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर होतो. अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांसह पात्र लाभार्थ्यांनी प्रगती साधावी आणि स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. अमृतपेठ–थेट बाजारपेठ या प्रदर्शनात जळगाव जिल्ह्यातील अमृतच्या योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपापले स्टॉल उभारले आहेत. या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्यमी महिला पतसंस्थेच्या चेअरमन पद्मजा अत्रे यांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन ग्राहकांना केले. तसेच समाजातील पात्र घटकांनी अमृतच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’चा आधार

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या विशिष्ट योजनांचा लाभ मिळत नसलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहाय्य करणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.सध्या संस्थेच्या विविध योजनांसाठी पात्र ठरणाऱ्या खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार व व्यवसायासाठी मदत उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, पात्र नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधून योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या जळगाव कार्यालयातर्फे करण्यात आले.दिवाळीच्या खरेदीसोबत स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन, महिला उद्योजकांना बाजारपेठ आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारे हे प्रदर्शन जळगावकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या