जळगाव – दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) : जळगाव येथे सर्किट बेंच तसेच पूर्ण खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी खंडपीठ कृती व संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री ना.गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावला खंडपीठ होणे ही काळाची गरज असून, समितीची मागणी न्याय्य व जनहिताची असल्याचे सांगितले. ही मागणी २०१३ पासून सातत्याने सुरू असल्याचे नमूद करून त्यांनी समितीच्या संघर्षाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळाने पुढे यावे. प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक पावलावर समितीसोबत राहू, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच खंडपीठ कृती समितीचे प्रणेते व अध्यक्ष ॲड. संजयसिंग आर. पाटील आणि संयोजक ॲड. विजय जगदीशप्रसाद शर्मा यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी ॲड.नारायण लाठी, ॲड. मिलिंद बडगुजर, नगरसेवक अरविंद देशमुख, ॲड. हरूल देवरे, ॲड. सागर चित्रे, ॲड. महेश भोकरीकर, ॲड. यशवंत महाजन, ॲड. भगवान पाटील, ॲड. धनंजय खेवलकर, जिल्हा विधी अधिकारी ॲड. सचिन पाटील, ॲड. कुणाल पवार, ॲड. अविनाश खडके, ॲड. चित्ते, ॲड. सचिन कुलकर्णी, ॲड. केतन सोनार आदी उपस्थित होते.
या उपक्रमास जिल्हा वकील संघाचे सहकार्य लाभले. मोठ्या संख्येने ज्युनिअर व सीनियर वकील उपस्थित होते. उपस्थितांचे समितीतर्फे संयोजक ॲड. विजय शर्मा यांनी आभार मानले.
