Friday, June 5, 2026
Homeताज्या बातम्या३४ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर मुख्याध्यापक जिजाबराव पाटील वडजीकर यांना सन्मानपूर्वक निरोप.....

३४ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर मुख्याध्यापक जिजाबराव पाटील वडजीकर यांना सन्मानपूर्वक निरोप.. ज्ञानदानाचा अखंड प्रवास पूर्ण…

भडगाव – दि.१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क).
शिक्षण क्षेत्रात तब्बल ३४ वर्षे समर्पित सेवा बजावल्या नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोणगाव (ता.भडगाव ,जि.जळगाव) ग्रेडेड मुख्याध्यापक जिजाबराव साहेबराव पाटील वडजीकर हे दिनांक ३१ मे २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले .त्यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने शैक्षणिक,सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण करत अनेक शाळांच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.बांबरुड खुर्द, बाळद,वडगाव बुद्रुक,वाक,पिचर्डे, पासखेडे, खुर्ची बुद्रुक (ता. एरंडोल) तसेच टोणगाव (ता. भडगाव) येथे त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले.त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शाळांनी शैक्षणिक,सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये विशेष यश संपादन केले.

शांत, संयमी आणि विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धतीमुळे श्री. पाटील यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. शाळेच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

त्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी पत्नी, मुलगा, सून, संपूर्ण परिवार,शिक्षकवर्ग,शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, माजी विद्यार्थी,मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या.निरोगी,आनंदी व यशस्वी जीवनासाठी सर्व स्तरातून सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

“सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नसून नव्या आयुष्याची सुरुवात आहे. शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची छाप अनेक पिढ्यांच्या मनात कायम राहील,”अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना मनःपूर्वक सलाम करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या