जळगांव – दि.१५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
शहरातील रुस्तमजी शाळेच्या पाठीमागे श्रीश्री लॉनस येथे दि.१४ रोजी संध्याकाळी ७ वाजता आयोजित मुंबई येथील प्रथितयश गंधार संस्थेच्या वतीने सादर सदाबहार हिंदी मराठी संगीत मैफिलीला रसिकजनांचा उताम प्रतिसाद लाभला.कडक थंडी असूनही शेवटपर्यंत रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
प्रभाग क्रमांक १३ भाजपा उमेदवारीसाठी इच्छुक राजेश व सौ.वैशाली नाईक यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते.परिसरातील व शहरातील अनेक मान्यवर संगीत प्रेमींनी या मैफिलीला हजेरी लावली.
मैफिलीत दर्जेदार व प्रभावी सूत्रसंचलन करणारे ज्येष्ठ सूत्र संचालक हेमंत बर्वे यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.उत्कृष्ट गायन शैलीची अनुभूती देणारे प्रसिद्ध गायक निलेश निरगुडकर,गायिका सौ.पल्लवी केळकर यांनी एकाहून एक अश्या हिंदी मराठी सुंदर गीतांनी रसिकांची मने जिंकली.
मैफिलीचा प्रारंभ स्वामी रामदासांच्या प्रार्थनेने करण्यात आली.त्यांनतर हिंदी मराठीतील अजरामर झालेल्या गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण गायकांनी केले.छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाची महती प्रकट करणाऱ्या दमदार गीताने वातावरणात स्फुरण चढले.समवेत श्री शिवरायांची आरती देखील सादर करण्यात आली. मैफिलीत दिवंगत प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना गीतातून श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या मध्यांतरात व्यासपिठावर आयोजक राजेश व सौ.वैशाली नाईक यांच्या वतीने कार्यक्रमाला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित भाजपा संघटन करणारे पदाधिकारी डॉ.राधेश्याम चौधरी,बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नितीन पारगावकर,बिना पॉल,बापू महाले,महेश कापुरे राजेश सोमाणी यांच्या हस्ते गायक कलावंताचा व ध्वनी व्यवस्था सांभाळणाऱ्या श्री सुनील सुद यांचा सत्कार शाल श्रीफळ देवून करण्यात आला.
तसेच मेहरून तलाव परिसरात रोज संगीत साधना करणाऱ्या समुह सदस्यांचा देखील आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या प्रसंगी कडक थंडीला सामोरे जाण्यासाठी रसिकांसाठी गरम दुग्धपान व्यवस्था देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी नाईक व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
