जळगाव – दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सत्यम पार्क येथील रहिवासी गुरुबंधू सतीश निकुंभ यांच्या निवासस्थानी जळगाव त्रिपदी परिवाराची साप्ताहिक त्रिपदी अत्यंत धार्मिक व भक्तिमय वातावरणात दि.१० गुरुवारी संपन्न झाली. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
या साप्ताहिक त्रिपदीची आरती सौ. नेहा निकुंभ व सतीश निकुंभ तसेच श्री. व सौ. राजू निकुंभ व परिवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जळगाव त्रिपदी परिवारातील सुमारे २५ गुरुबंधूंची उपस्थिती लाभली.
जळगाव शहरातील विविध भागांमध्ये साप्ताहिक त्रिपदीचे आयोजन सातत्याने केले जात आहे. वाघनगर, दादावाडी, महाबळ, खेडी रोड, संभाजीनगर यांसह शहरातील विविध भागांतील गुरुबंधू उत्स्फूर्तपणे साप्ताहिक त्रिपदीचे आयोजन करीत आहेत. श्रीदत्त भक्तांकडूनही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक ठिकाणी भक्तिमय वातावरणात त्रिपदी संपन्न होत आहे.
याबाबत ज्येष्ठ गुरुबंधू अनिल तारे यांनी माहिती देताना सांगितले की, जळगाव शहरातील विविध भागांत गुरुबंधू मोठ्या उत्साहाने साप्ताहिक त्रिपदीचे आयोजन करीत असून, या माध्यमातून श्रीदत्त भक्तीचा प्रसार आणि गुरुबंधूंमधील आध्यात्मिक स्नेह अधिक दृढ होत आहे.
अखेर आरतीनंतर उपस्थित गुरुबंधूंना प्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्तिमय वातावरणात झालेल्या या साप्ताहिक त्रिपदीने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव दिला.
