जळगाव : – दि.७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवाच्या माध्यमातून आनंदासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची प्रत्येक गणेश मंडळाने व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अर्पण सेवा ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेच्या मोठ्या आवाजावर नियंत्रण ठेवावे किंवा शक्यतो डीजेचा वापर टाळावा. तसेच शाडू माती व नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करावा. त्यामुळे जलप्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल. यासोबतच सजावटीमध्ये अनावश्यक वीज वापर टाळून वीज बचतीचा संदेशही प्रत्यक्ष कृतीतून देण्याची गरज आहे.
याबाबत पवन ट्रस्ट व अर्पण सेवा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी विविध गणेश मंडळांना व मंडळातील सदस्यांना प्रत्यक्ष भेटून जनजागृती केली. गणेशोत्सव उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा व्हावा; मात्र त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षणही झाले पाहिजे, अशी भूमिका संस्थेने मांडली.
“गणेशोत्सव साधेपणाने आणि उत्साहाने साजरा करताना पर्यावरणाचाही विचार होणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणि वीज बचत यासाठी प्रत्येक मंडळाने पुढाकार घ्यावा,” असे मत पवन ट्रस्टचे अध्यक्ष व राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर डॉ. विलास नारखेडे यांनी व्यक्त केले.
‘बाप्पाचे स्वागत करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया’ या संदेशातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री समाधान सोनवणे साहेब, तुषार डवरे ,अमोल ढोबळे, स्नेहल सोनवणे्, रघुनाथ राणे,पवन नारखेडे,डॉ.हरीश सोनार सुधाकर सपके,लीलाधर नारखेडे,व अर्पण सेवा ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
