पुणे : – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) थॅलेसेमिया रुग्णांसाठी सातत्याने रक्त उपलब्ध करून देत त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे रक्तदाता व सामाजिक कार्यकर्ते रणजीत गव्हाळे यांना सुजय प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने यावर्षीचा ‘समाजगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
थॅलेसेमिया रुग्णांना साधारणपणे दर १५ ते २१ दिवसांनी रक्ताची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रणजीत गव्हाळे हे स्वतःची नोकरी सांभाळून सातत्याने कार्यरत आहेत. रक्तदात्यांची यादी तयार करणे, रक्तपेढ्यांशी समन्वय साधणे, ताजे रक्त उपलब्ध करून देणे तसेच रात्री-अपरात्रीही गरजूंच्या मदतीला धावून जाणे, हे त्यांच्या सेवाकार्याचा नियमित भाग बनले आहे.
केवळ रक्त उपलब्ध करून देण्यापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी निराश झालेल्या रुग्णांच्या पालकांना धीर देण्याचे आणि रुग्णांना जगण्याची नवी उमेद देण्याचे काम केले आहे. ‘अंक-जीत परिवार’ यांच्या माध्यमातून ही रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्याचे कार्य सुरू आहे. रणजीत गव्हाळे यांनी आतापर्यंत ७७ वेळा, तर त्यांच्या पत्नी अंकिता गव्हाळे यांनी १८ वेळा रक्तदान केले आहे.
समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी केलेल्या या निःस्वार्थ सेवाकार्याची दखल घेत सुजय प्रतिष्ठानने त्यांचा ‘समाजगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला. त्यांच्या सेवाभावी कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या गौरव सोहळ्यास मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, ‘थर्मोकोल मॅन’ रामदास माने, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव आणि शांतिदूत परिवाराच्या अध्यक्षा विद्या जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना रणजीत गव्हाळे यांनी, “हा पुरस्कार माझा नसून अंक-जीत परिवारासोबत रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आहे,” अशी भावना व्यक्त केली.
रणजीत गव्हाळे यांना ‘समाजगौरव पुरस्कार’ प्रदान
RELATED ARTICLES
