Friday, September 11, 2026
Homeजळगांव जिल्हाबालकवी ठोंबरे जयंतीनिमित्त भादलीत काव्य मैफिल..डबा पार्टीने रंगला साहित्यिक सोहळा..

बालकवी ठोंबरे जयंतीनिमित्त भादलीत काव्य मैफिल..डबा पार्टीने रंगला साहित्यिक सोहळा..

भादली (जळगाव):-दि.१४(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) निसर्गाच्या अथांग सौंदर्याला कोआपल्या शब्दांतून अजरामर करणारे थोर निसर्गकवी ‘बालकवी’ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) भादली रेल्वे स्टेशन येथे ‘काव्य मैफिल’ व साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लेवा गणबोली साहित्य मंडळ आणि जिल्हा साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला कवी, साहित्यिक, लेखक व निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी बालकवींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘औदुंबर’, ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ आणि ‘ती फुलराणी’ यांसारख्या बालकवींच्या प्रसिद्ध रचनांचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विविध कवींनी निसर्ग व सामाजिक आशयाच्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

बालकवींच्या स्मारकाच्या मागणीचा पुनरुच्चार

कार्यक्रमाचे आयोजक व कलावंत तुषार वाघुळदे यांनी बालकवींच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी यापूर्वी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.सन २०१८ मध्ये भादली रेल्वे स्थानकावर बालकवींचा अर्धाकृती पुतळा उभारावा, स्थानकाच्या भिंतींवर निसर्गचित्रे साकारावीत, स्मारक परिसरात एलईडी दिव्यांची व्यवस्था करावी तसेच ‘बालकवी निसर्ग उद्यान’ उभारावे,या मागण्यां साठी आंदोलन व रेल्वे रोको करण्यात आला होता. याबाबत तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे, खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली होती.मात्र अद्यापही या मागण्यांची पूर्ण पूर्तता न झाल्याबद्दल उपस्थित साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली.भादली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर हुकूमसिंग पाटील यांनी या मागण्यांबाबत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगून लवकरच पूर्तता होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली. नवीन स्मारकाच्या काही फरशा निघाल्या असून तेथे बालकवींची प्रतिमाही अद्याप लावण्यात आलेली नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.       कवी संमेलन व साहित्यचर्चेला रंगत

बालकवींच्या निसर्गकवितांचा ठेवा आणि त्यांच्या साहित्यिक योगदानावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. निसर्ग संवर्धन आणि समकालीन साहित्य या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक अरविंद नारखेडे,तुषार वाघुळदे,पत्रकार प्रसाद जोशी यांच्यासह रसिक-श्रोत्यांनी सहभाग घेतला.कवी संमेलनात ॲड.राधिका ढाके, अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, शीतल पाटील, सुधीर चौधरी, मयूर पाटील आदींनी आपल्या कविता सादर केल्या. बालकवींच्या काही गेय रचनांचा अल्बम समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तुषार वाघुळदे यांनी सांगितले.पत्रकार प्रसाद जोशी यांनी बालकवींच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.नव्या पिढीपर्यंत बालकवींचा साहित्यिक वारसा पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत,असे त्यांनी आवाहन केले.

अनोख्या‘डबा पार्टी’ने कार्यक्रमात आपुलकीची वीण

कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली ती अनोखी ‘डबा पार्टी’.काव्य मैफिलीनंतर सर्व कवी व साहित्यिकांनी सोबत आणलेले जेवणाचे डबे एकत्र उघडून सहभोजनाचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक व आपुलकीचे स्वरूप प्राप्त झाले. साहित्यिकांच्या या अनोख्या सहभोजनाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.</strong कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव तुषार वाघुळदे,हभप गोपाळ ढाके,लेखक ए.के.नारखेडे,चीफ टीएमसी जयश्री तायडे,टीआय नवीन कुमार,वीरेंद्र जयस्वाल, उपप्रबंधक कुणाल शेगोकार,नितीन नाईक तसेच भादलीच्या पोलीस पाटील ॲड.राधिका ढाके यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार ॲड.राधिका ढाके यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या