Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरनिसर्गप्रेमी-साहित्यिकांसाठी आवाहन..! भादली रेल्वे स्टेशनला १३ ऑगस्टला'बालकवी'ठोंबरे जयंती निमित्त'काव्य मैफिल'रंगणार...!

निसर्गप्रेमी-साहित्यिकांसाठी आवाहन..! भादली रेल्वे स्टेशनला १३ ऑगस्टला’बालकवी’ठोंबरे जयंती निमित्त’काव्य मैफिल’रंगणार…!

भादली (जळगाव):-दि.१२(धर्मसाथी मिडिया नेटवर्क) निसर्गाच्या अथांग सौंदर्याला आपल्या शब्दांतून अजरामर करणारे थोर निसर्ग कवी ‘बालकवी’ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी,दि.१३ ऑगस्ट २०२६ रोजी एका विशेष आणि भरगच्च सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लेवा गणबोली साहित्य मंडळ’ आणि ‘जिल्हा साहित्य व सांस्कृतिक मंच’यांच्या संयुक्त विद्यमाने भादली रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी १० वाजता या भव्य’काव्य मैफिल’आणि साहित्यिक सोहळ्याचा पडघम वाजणार आहे.या कार्यक्रमाचे निमंत्रक तुषार वाघुळदे, गोपाळ ढाके आणि भादलीच्या पोलीस पाटील ॲड.राधिका ढाके यांनी जिल्ह्यातील सर्व कवी, साहित्यिक, लेखक आणि निसर्गप्रेमींना या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अगत्याचे आवाहन केले आहे.

याप्रसंगी कलावंत व कवी तुषार वाघुळदे हे बालकवींच्या स्मारकबाबत चर्चा करणार आहेत. निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचे अतिशय तरल आणि सोप्या शब्दांत वर्णन करण्याचे अफाट कौशल्य निसर्गकवी बालकवी यांच्याकडे होते.त्यांच्या कवितांमध्ये निसर्गाचे अत्यंत जिवंत, देखणे आणि भावपूर्ण चित्रण आढळते. “श्रावणमास” (‘श्रावणमासी हर्ष मानसी…’) औदुंबर,फुलराणी,आनंदी आनंद गडे,संध्यारजनी यासारख्या अजरामर कवितांची निर्मिती केली.या शब्द सोहळ्यास भादली ग्रामपंचायतचे प्रशासक मनोज चौधरी,जेष्ठ साहित्यिक ए.के.नारखेडे सर,रेल्वे स्टेशन मास्तर मुकुंदसिंग पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी साहित्यिक व्याख्याने, बालकवींच्या साहित्यावर आणि त्यांच्या जीवनप्रवासावर मान्यवरांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन,भव्य कवी संमेलन,स्थानिक आणि निमंत्रित कवींच्या कवितांनी रंगणारी शब्दांची मैफिल,चर्चासत्र,सद्यस्थितीतील साहित्य आणि निसर्ग संवर्धन या विषयावर खुली चर्चा,अनोखी ‘डबा पार्टी’ म्हणजे वन भोजन होईल..कार्यक्रम संपल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांसोबत एकत्र जेवणाचा म्हणजे वन भोजनाचा आनंद घेण्यासाठी ‘डबा पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे.

येताना सर्व साहित्यिक- रसिकांनी आपल्यासोबत स्वतःचा जेवणाचा डबा आवर्जून सोबत आणावा.शब्दांच्या या अथांग सागरात आणि निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्यासाठी सर्व साहित्य रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. @ 9405057141

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या