जळगाव – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
दि.१० ऑगस्ट रोजी लेवा एज्युकेशनल युनियन संचलित नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ चा गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा सोमवारी धांडे सभागृह, लेवा बोर्डिंग येथे अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेवा एज्युकेशनल युनियनचे उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगावचे माजी प्राचार्य डॉ. अशोक राणे उपस्थित होते. यावेळी लेवा एज्युकेशनल युनियनचे खजिनदार किरण दादा बेंडाळे, प्राचार्या सुलभा एस. राणे, उपमुख्याध्यापक पी. व्ही. वाणी, ज्येष्ठ पर्यवेक्षक व्ही. एस. सैंदाणे, पर्यवेक्षिका बी. एस. राणे तसेच कार्यालय प्रमुख संदीप डोलारे उपस्थित होते.
सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षातील एस.एस.सी., एच.एस.सी. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींच्या पालकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
ज्युनिअर कॉलेजमधील बक्षीसपात्र विद्यार्थिनींमध्ये सृष्टी संदेश कलानी, रोशनी सत्यविजय काळे, कुमुदिनी शशिकांत पाटील, गायत्री विनोद सोनवणे आणि दिशा हेमंतकुमार कुक्रेजा यांचा समावेश होता. तर एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी म्हणून कोमल प्रमोद अत्तरदे, अक्षरा महेंद्र चोपडे, वेदिका प्रदीप दुसाने, ग्रीष्मा सुरेश चौधरी आणि कल्याणी विजय इंगळे यांचा गौरव करण्यात आला.
चिनार जयंत कोल्हे हिने महाराष्ट्र राज्यातून इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत तेरावा क्रमांक प्राप्त करून विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल, तसेच मनस्वी तायडे हिच्या तायक्वांदोमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच चारित्र्य, शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. विद्यार्थिनींनी भविष्यात अधिक उंच भरारी घेत विद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचा संकल्पही व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सुलभा राणे यांनी केले. सूत्रसंचालन जे. आर. भंगाळे, एम. व्ही. झोपे आणि के. व्ही. जंगले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आर. डी. वराडे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन जे. व्ही. मोरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी के. व्ही. जंगले, जी. एल. भारंबे, व्ही. एस. कुरकुरे, एम. व्ही. फिरके यांच्यासह समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास लेवा एज्युकेशनल युनियनचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
