जळगाव – दि.१६(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
ऑक्टोबर २०२६ दरम्यान जळगाव भारत स्काउट्स आणि गाईड्स,जिल्हा कार्यालयाच्या वतीने आयोजित संघनायक प्रशिक्षण शिबिर जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.या शिबिरात जिल्ह्यातील १६ शाळांमधील एकूण १०२ स्काऊट-गाईड व 18 युनिट लीडर सहभागी झाले होते.
शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निलेश पाटील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हा मुख्य आयुक्त उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, स्वावलंबन, संघभावना, सेवाभाव आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, तसेच शालेय स्तरावर स्काऊट-गाईड चळवळ अधिक प्रभावी पणे राबविणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिरामध्ये ध्वजारोहण,संघनायकाची भूमिका व जबाबदाऱ्या, संघ पद्धती,स्काऊट-गाईड गणवेश, ध्वजाची माहिती, अभ्यासक्रमाचा कालावधी तसेच प्रवेश ते तृतीय सोपान या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच स्काऊट-गाईडमधील विविध पुरस्कारांची माहिती, होकायंत्राचा वापर आणि मागच्या खुणा ओळखण्याचे तंत्र याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिक सत्रामध्ये विविध प्रकारच्या गाठी व बांधण्या, प्रथमोपचार, बँडेज बांधण्याच्या पद्धती आणि बी.पी. सिक्स (B.P. Six) व्यायाम यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडच्या मूलभूत कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. संघाचे प्रभावी नेतृत्व, सदस्यांमधील समन्वय आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.या शिबिरासाठी श्रीमती वैशाली अवथळे, जिल्हा संघटक गाईड;अर्पित कडू, जिल्हा संघटक स्काऊट;रवींद्र कोळी,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट;डॉ.व्ही.एस.पाटील,ए.एल.टी,श्रीमती रत्नमाला बागुल,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड;तसेच सौंदाणे सर,पंकज कोळी,स्काऊट मास्टर यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. तसेच उपस्थित शाळांतील स्काऊट मास्टर आणि गाईड कॅप्टन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यालयीन कर्मचारी कनिष्ठ लिपीक संदीप पाटील,श्रीमती कविता पाटील,शिपाई प्रणव गंगाखेडकर व श्याम भोलाने यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
स्काऊट-गाईड चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, निसर्गप्रेम, सेवाभाव, स्वावलंबन आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार रुजविण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.शिबिराच्या शेवटी सहभागी झालेल्या सर्व १०२ स्काऊट-गाईडना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वाची दिशा मिळाली असून, शालेय स्तरावर स्काऊट-गाईड उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.गिरीष रमणलाल भावसार स्काऊट शिक्षक जळगा
