जळगाव:- दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
रोटरी जळगाव एन्क्लेव्ह आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित‘लोक सहभागातून गणेशोत्सव महाचर्चा’शुक्रवारी,११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता महादेवी नगर येथील रोटरी हॉलमध्ये अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या कार्यक्रमास रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांचे विशेष सहकार्य लाभले.
गणेशोत्सवाचे नियोजन अधिक सुलभ,पर्यावरणपूरक आणि जनसहभागातून शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे या उद्देशाने या विशेष महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रोहन घुगे,महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने,रोटरी ३०३० चे प्रांतपाल डॉ.राजेश पाटील,सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आणि रोटरी जळगाव एन्क्लेव्हचे सचिव विपुल पारेख,रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे ॲड.केतन ढाके,रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या अध्यक्षा किरण सिंग व प्रोजेक्ट चेअरमन मनीष पात्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महाचर्चेदरम्यान गणेशोत्सवातील विविध सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, कायदा व सुव्यवस्थेचे पालन तसेच गणेश मंडळांच्या सहकार्याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.उपस्थित प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांनी गणेशोत्सव शांततेत आणि व्यापक लोकसहभागातून साजरा करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी,रोटरी क्लबचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोहन घुगे,जिल्हाधिकारी जळगाव यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की सार्वजनिक गणेशोत्सव शांतता पूर्वक साजरा करतांना महिला व बालकल्याण सारख्या योजनांचा लाभ तसेच इतर शासनमान्य योजनांचा लाभ जन सामान्यांपर्यंत पोहचवावा. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र असताना जनसामान्य लोकांपर्यंत विषय पोहचविणे सहज शक्य होते असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आदित्य जीवने, आयुक्त, जळगांव मनपा यांनी संवाद साधताना सांगितले की सार्वजनिक गणेशोत्सव महा मंडळासोबतच शहरातील एकूण गणेशोत्सवाचा आढावा घेतला. याकाळात होणाऱ्या अतिक्रमणाबाबत आढावा घेतांना त्यांनी कर्मचारी वृद्धाला होणाऱ्या त्रासाबाबत माहिती देताना त्यांना जर रोटरी तर्फे इलेक्ट्रिक वाहन देता आले तर ते कार्य रोटरीने करावे असे आवाहन देखील केले.
डॉ. राजेश पाटील प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०यांनी बोलताना सांगितले की एक गाव एक गणपती सारख एक कॉलनी एक गणपती असावा. याकरिता रोटरी तर्फे उत्कृष्ट तीन मंडळांना पुरस्कार देता येतील. सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी रोटरी पुढाकार घेऊन गणेश मंडळ स्वच्छता पुरस्कार देखील देऊ शकते अशी इच्छा व्यक्त केली. रोटरीने मिरवणुकीत निर्माल्य व इतर सेवा द्याव्यात असे आवाहन केले. ध्वनी प्रदूषण बाबत जागरूकता व्हावी त्याकरिता महामंडळाने प्रयत्न करावेत. असेही ते यावेळी म्हणालेत.
याप्रसंगी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करणाऱ्या किशोर देशमुख, विकास चौधरी या दोन पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार जिल्हाधिकारी व किशोर भोसले सुरज दायमा यांच्या शुभहस्ते करण्यात आला. प्रस्ताविक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी तर सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख मनीष पात्रीकर यांनी व आभार रोटरी एन्लेवचे सचिव विपुल पारेख यांनी मानले.
जळगावात ‘लोकसहभागातून गणेशोत्सव महाचर्चा’ उत्साहात संपन्न.. प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती..
RELATED ARTICLES
