जळगांव – दि.०७ जुलै (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या वतीने आज जळगाव येथे नवीन ‘आधार सेवा केंद्र’कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.विश्वसनीय डिजिटल ओळख सेवा प्रदान करणे आणि ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेला बळकटी देणे,या युआयडीएआयच्या ध्येयाचाच हा एक भाग आहे.
. प्रमुख वैशिष्ट्ये:
सुलभ आणि सोयीस्कर सुविधा: हे नवीन आधार सेवा केंद्र पुरुषोत्तम नगर, डी-मार्ट जवळ, जळगाव – ४२५००१ येथे स्थित असून, आठवड्याचे सातही दिवस सुरू राहील. या ठिकाणी नवीन आधार नोंदणी, ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, लोकसंख्याशास्त्रीय दुरुस्ती आणि जागेवरच तक्रार निवारण यांसारख्या सेवा उपलब्ध असतील. समावेशक पायाभूत सुविधा: या केंद्रामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामध्ये व्हीलचेअरची सोय, सुलभ शौचालये आणि नागरिकांना विनाअडथळा सेवा मिळण्यासाठी एका विशेष’आधार सेवा केंद्र व्यवस्थापकाची ‘नियुक्ती करण्यात आली आहे.
डिजिटल साधने:
नागरिक ‘युआयडीएआय’च्या अपॉइंटमेंट पोर्टलवर(https://bookappointment.uidai.gov.in) जाऊन आधीच आपली वेळ आरक्षित करू शकतात. तसेच,या केंद्राचे भौगोलिक स्थान (Geo-tagged location)’भुवन आधार पोर्टल’ वर(https://bhuvanapp3.nrsc.gov.in/aadhaar)उपलब्ध आहे.
. भविष्यासाठी सज्ज सेवा:
पुढील पिढीची डिजिटल ओळख सुरक्षित करण्यासाठी शाळांमध्ये विशेष बायोमेट्रिक अपडेट शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
. मान्यवरांची उपस्थिती:
या उद्घाटन सोहळ्याला युआयडीएआय,प्रादेशिक कार्यालय मुंबईचे उपमहासंचालक श्री. लवकेश ठाकूर, युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय मुंबईचे उपसंचालक मंदार जेवरे, जळगावच्या तहसीलदार श्रीमती शीतल राजपूत आणि युआयडीएआय, जिल्हा प्रशासन तसेच सेवा पुरवठादार संस्था ‘बीएलएस’ चे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय मुंबईचे उपमहासंचालक लवकेश ठाकूर म्हणाले की”जळगावमधील हे आधुनिक आधार सेवा केंद्र येथील नागरिकांना अधिक जलद,सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा सुनिश्चित करेल.’डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
सर्व आधार सेवा केंद्रे थेट’युआयडीएआय’द्वारे त्यांच्या भागीदार संस्थेच्या माध्यमातून चालवली जातात;जेणे करून सेवांचा दर्जा एकसमान राहील,डेटा सुरक्षा मजबूत असेल आणि तक्रारींचे वेळेत निवारण केले जाईल. प्रत्येक नागरिकाला एक विश्वसनीय डिजिटल ओळख प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा युआयडीए आयने याद्वारे पुनरुच्चार केला आहे.
