जळगाव – दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
केंद्र शासनाच्या नवीन किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीचे खासदार सौ. स्मिताताई वाघ यांना भाजपा कामगार आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाने कोड ऑन वेजेस, २०१९ व २०२० अंतर्गत लागू केलेल्या नियमांनुसार नवीन किमान वेतनास मान्यता दिली असून, महाराष्ट्र शासनानेही त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया स्वीकारलेली आहे.
मात्र, राज्यातील काही खासगी बँका, वित्तीय संस्था तसेच त्यांच्यामार्फत कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षक व कंत्राटी कामगारांना अद्यापही नवीन किमान वेतनानुसार वेतन मिळत नसल्याची गंभीर बाब भाजपा कामगार आघाडीने निदर्शनास आणून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सचिव श्री कुमार श्रीरामे,सरचिटणीस श्री गोपाल पवार आणि सदस्य श्री सुरेश पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार.सौ.स्मिताताई वाघ यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन किमान वेतनाची राज्यातील सर्व संबंधित आस्थापनांमध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच नवीन वेतनापासून वंचित राहिलेल्या सुरक्षारक्षक व कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, यासाठी हा विषय केंद्र सरकारच्या स्तरावर ठामपणे मांडून पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.
खासदार सौ.स्मिताताई वाघ यांनी निवेदन स्वीकारून या विषयाचा संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष व पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार भाजपा कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
