Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरकर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त विद्यार्थी सहाय्यक समितीत प्रेरणादायी मार्गदर्शन

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त विद्यार्थी सहाय्यक समितीत प्रेरणादायी मार्गदर्शन

जळगांव – दि.१४ “शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे” या विचाराला आपल्या कार्यातून कृतीची दिशा देणारे थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगाव येथे प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रा.एन.व्ही.भारंबे माजी उपप्राचार्य एम.जे. कॉलेज जळगाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि महान शैक्षणिक कार्याचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून सांगितला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत त्यांनी ग्रामीण, गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.“कमवा आणि शिका” या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि शिक्षणाची सांगड घालून देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नव्हते, तर व्यक्ती घडविण्याचे, आत्मनिर्भर बनविण्याचे आणि समाजपरिवर्तन घडविण्याचे माध्यम होते. त्यांच्या विचारांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला, श्रमाला प्रतिष्ठा देण्याला आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचविण्याला विशेष महत्त्व होते.

प्रा.भारंबे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना कर्मवीरांच्या विचारांचा केवळ गौरव न करता तो आपल्या जीवनात आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली.कष्ट,शिस्त,स्वावलंबन,प्रामाणिकपणा आणि शिक्षणावरील निष्ठा हीच कर्मवीरांना खरी आदरांजली ठरेल,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास डॉ.एस.एस.राणे,व्यवस्थापक प्रवीण सोनवणे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत आजही हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करीत आहे. त्यांच्या विचारांना कृतीची जोड देत “शिक्षणातून परिवर्तन आणि स्वावलंबनातून विकास”या दिशेने वाटचाल करणे, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या