जळगाव, दि. २५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) : राधाकृष्ण नगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमेळा समिती संचलित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महाआरती, महाप्रसाद, वृक्षारोपण आणि बाल वारकऱ्यांच्या दिंडीमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय झाला.
सकाळी ९ वाजता आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महाआरती करण्यात आली. यावेळी भाजपा महानगराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक सूर्यवंशी, डॉ. महेंद्र काबरा यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर दुपारी १२ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी “वृक्ष लावा… वृक्ष जगवा” या अभियानात प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी मंदिराच्या विकासकार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आर्या क्लासेसचे संचालक ॲड. संदीप ठाकरे व सौ. सुवर्णा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विद्यार्थी-विद्यार्थिनींची वारकरी दिंडी उत्साहात काढण्यात आली. विठ्ठलनामाचा गजर करीत मंदिराला प्रदक्षिणा घालत दिंडी पुन्हा मंदिरात दाखल झाली. यानंतर बाल वारकऱ्यांना प्रसादाचे वितरण करण्यात आले तसेच आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सांगण्यात आले.
आज सायंकाळी मंदिरात हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमेळा समिती व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय नारखेडे, संजय भावसार, हरिभाऊ भोई, राजेंद्र जोशी, संजय क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर, गोपाल पवार, राजू मराठे, प्रकाश शेवाळे, अतुल भट, दत्तू बडगुजर, अनिल साठे, प्रवीण पाटील, अमोल सूर्यवंशी, भैय्या चौधरी, मुकुंद चौधरी यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.
आषाढी एकादशी उत्सव : राधाकृष्ण नगरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरण महाआरती, महाप्रसाद, वृक्षारोपण व बाल वारकऱ्यांच्या दिंडीने भाविकांची मने जिंकली..
RELATED ARTICLES
