Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरकिनगाव प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा : किरीट सोमय्या पोलिसांच्या कारवाईचे...

किनगाव प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा : किरीट सोमय्या पोलिसांच्या कारवाईचे कौतुक; आरएसएस पथसंचलनावरील हल्ल्याची घेतली दखल

जळगाव :- दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कौतुक केले.या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. किनगाव येथील घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज असून, पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे ते म्हणाले. हल्ल्याच्या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींवरही कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

किनगावमध्ये ज्या गल्लीमध्ये वाद झाला, त्या परिसरात काही व्यक्तींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. स्वातंत्र्यानंतरही संबंधित मार्गावरून अंत्ययात्रा काढताना अडचणी येत असल्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूकही तेथून जाऊ शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. अशी परिस्थिती दुर्दैवी असून, नागरिकांना सुरक्षित वातावरणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम करता आले पाहिजेत, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील लोकसंख्येतील बदलांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. मुस्लिम लोकसंख्या २३ टक्क्यांनी वाढत असून हिंदू लोकसंख्या सहा टक्क्यांनी वाढत असल्याची आकडेवारी त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. लोकसंख्यावाढीतील या फरकावर चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

देशात स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता राहिल्याने समाजात गुलामगिरीची मानसिकता निर्माण झाली होती. मात्र, समाज हळूहळू त्या मानसिकतेतून बाहेर पडत असल्याचे सोमय्या म्हणाले. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यानंतर बदलाला सुरुवात झाली आणि २०१९ नंतर त्याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू लागले, असे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० संदर्भातील निर्णय आणि अयोध्येतील राममंदिर उभारणीचा उल्लेख करत गेल्या काही वर्षांत महत्त्वाचे निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातही बदल दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबईतील मशिदींवरील भोंग्यांच्या प्रश्नावर झालेल्या कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला.

या पत्रकार परिषदेला आ अमोल जावळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी महापौर दीपमालाताई काळे,आणि केतकी पाटील प्रसिद्ध प्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या