जळगाव :- (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जळगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव येथे शिवशक्ती कथक गुरुकुलमच्या वतीने भक्तिमय आणि भावपूर्ण नृत्यसेवेचे आयोजन करण्यात आले. या नृत्यसेवेत शिवशक्ती कथक गुरुकुलमच्या एकूण १४ विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या नृत्यकलेतून श्रीरामचरणी सेवा अर्पण केली.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर भगवान शिवाच्या तांडवमय स्वरूपाचे दर्शन घडविणारे ‘शिवतांडव’ सादर करण्यात आले. कथकच्या लय, ताल आणि भावमुद्रांचा सुंदर मिलाफ साधत विद्यार्थिनींनी विविध रचना सादर केल्या.
यामध्ये ‘नादातुनीया नाद निर्मितो’,‘रखुमाई’,‘नटरंग उभा’ तसेच विविध अभंग यांचा समावेश होता. भक्तिरस, तालबद्ध पदन्यास, आकर्षक हस्तमुद्रा आणि भावपूर्ण अभिनयातून विद्यार्थिनींनी उपस्थित रसिकांची मने जिंकली.
या नृत्यसेवेद्वारे भारतीय शास्त्रीय नृत्यकलेच्या माध्यमातून भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मंदिराच्या पावन वातावरणात सादर झालेल्या या नृत्यसेवेमुळे उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब होण्याचा अनुभव मिळाला.
या नृत्यसेवेत शिवशक्ती कथक गुरुकुलमच्या १४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनींच्या सादरीकरणाला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवशक्ती कथक गुरुकुलमच्या वतीने मंदिरातील या नृत्यसेवेतून भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेला भक्तीशी जोडण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.

