जळगाव – दि.१० (धर्मसाथी मिडिया नेटवर्क)
आर्किड नेचर फाउंडेशन,जळगाव यांच्या वतीने दि.९ ऑगस्ट रोजी पोखरी तांडा येथील गुरुदरबार स्वामीसखा आश्रम परिसरात पर्यावरण सहल व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमात विद्यार्थी, ग्रामस्थ व फाउंडेशनच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत १०० विविध सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड केली.परिसर हिरवाईने बहरावा आणि विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
त्यापूर्वी पाळधी येथील श्री सिद्धिविनायक महागणपतीचे दर्शन घेऊन सर्वजण पोखरी तांडा येथील स्वामीसखा आश्रमात दाखल झाले. यावेळी आर्किड नेचर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
आश्रमातील सप्तचिरंजीव व १२ हनुमान मंदिरांची माहिती आचार्य राम महाराज भावसार यांनी दिली. तसेच गुरुदरबार येथे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
गुरुदरबार येथे दर रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुलांसाठी आत्मविश्वास वृद्धी , जीवनमार्गदर्शन तसेच धार्मिक व आध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शन केले जाते. वृक्षारोपणानंतर सहभागी ५० ते ६० विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने केळी, राजगिरा लाडू व दाण्याची चिक्कीचे वाटप करण्यात आले.
प्रा. वसंत सोनवणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना श्री हनुमान चालीसा पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण केले.
फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरती कुलकर्णी, माजी अध्यक्ष किशोर महाजन, कार्याध्यक्ष डॉ. विकास पाटील, प्रा. वसंत सोनवणे, सोनवणे मॅडम, विनय काळे, जयंत राणे, प्रसाद जोशी, विलास बरडे, कीर्ती बरडे, धीरा बरडे व प्रा. दिलीप भारंबे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
निसर्ग संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाबद्दल गुरुदरबार स्वामीसखा आश्रम व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून फाउंडेशनचे आभार मानले. लावण्यात आलेल्या सर्व वृक्षांच्या संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी महंत राम भावसार यांनी स्वीकारली आहे.
पोखरी तांडा स्वामी सखा आश्रम परिसरात ऑर्किड फाउंडेशन तर्फे पर्यावरण सहल व वृक्षारोपण उपक्रम.. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; १०० वृक्षांचे रोपण
RELATED ARTICLES
