जळगाव :-दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगाव शहरापासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरी तांडा (पाळधी जवळ)येथील स्वामी सखा आश्रम परिसरात रविवार,दि.९ ऑगस्ट रोजी आर्किड नेचर फाउंडेशनतर्फे १०० विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. पर्यावरण सहलीच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमामुळे विकसित होत असलेल्या धार्मिक व आध्यात्मिक परिसराच्या हरित सौंदर्यात भर पडणार आहे.
वृक्षारोपणाचे काम कमी वेळेत पूर्ण व्हावे तसेच सहभागींचे श्रम कमी व्हावेत,यासाठी आवश्यक खड्डे ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साहाय्याने तयार करण्यात आले आहेत.वृक्षलागवडीसाठी आवश्यक रोपेही कार्यक्रम स्थळी पोहोचविण्यात आली असून, कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास आली आहे.
दि.९ रविवार रोजी सहभागी पदाधिकारी व सदस्य सिद्धिविनायक महागणपती देवस्थान येथे दर्शन घेतल्यानंतर पोकरी तांडा येथे पोहोचतील.सकाळी १० ते १२ या वेळेत मान्यवर पदाधिकारी,सदस्य आणि निसर्गप्रेमींच्या सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.
या उपक्रमासाठी पोखरी तांडा येथील आश्रमाचे प्रमुख राम भावसार,गावातील रहिवासी,तसेच जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी व निसर्गमित्र विलास बरडे यांचे भरीव सहकार्य लाभत आहे.
निसर्गसेवेसाठी आर्किड नेचर फाउंडेशनतर्फे विविध भागांत पर्यावरण सहलींचे आयोजन करून निसर्गमित्रांना प्रशिक्षित केले जाते.निसर्गसेवेची गोडी निर्माण करणे, सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच पर्यावरणाशी संबंधित विविध विषयांची माहिती देणे,यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.पदाधिकारी व सदस्यांच्या आर्थिक सहकार्याने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर संस्था सातत्याने पर्यावरणविषयक कार्य करीत असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख तथा आर्किड नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष आर. एन.कुळकर्णी आणि सचिव सुनीता महाजन यांनी‘धर्मसाथी लाईव्ह न्यूज’शी बोलताना दिली.
पोखरी तांडा येथे १०० वृक्षांचे होणार रोपण आर्किड नेचर फाउंडेशनतर्फे ९ ऑगस्ट रोजी पर्यावरण सहलीसह वृक्षारोपण कार्यक्रम..
RELATED ARTICLES
