जळगाव, दि. २७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) – वाचकांना नव्या विचारांची दिशा देणारे, आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे आणि मनातील भावनांना शब्दबद्ध करणारे साहित्य म्हणजे लेखकाच्या अनुभवांचे प्रतिबिंब असते. अशाच स्पुट लेखनातून साकारलेल्या ‘मनातले पानावर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा.शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लेखक कौस्तुभ सुधाकर परांजपे, मातोश्री रोहिणी परांजपे, मंदाताई परांजपे,सौ.ममता परांजपे तसेच मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर परांजपे परिवारातर्फे प्रमुख अतिथी प्रा. शरदचंद्र छापेकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालकांनी लेखक कौस्तुभ परांजपे व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिल्यानंतर पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन संपन्न झाले.
यावेळी लेखक कौस्तुभ परांजपे यांनी आपल्या मनोगतातून पुस्तक लेखनामागील प्रेरणा आणि भूमिका स्पष्ट केली. दैनंदिन जीवनातील अनुभव, मनातील अस्वस्थता, संवेदना आणि विचार यांना स्पुट लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्ती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. शरदचंद्र छापेकर म्हणाले की, “वाचकांच्या भूमिकेतून काय समजावे, हे पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रभावीपणे मांडले आहे. राहवत नाही म्हणून जे लिखाण जन्माला येते, तेच खरे साहित्य असते. ज्याच्या हृदयात जखम होते, तोच आपल्या अनुभवातून प्रभावी लेखन करू शकतो.
“ते पुढे म्हणाले की, साहित्याचे उद्दिष्ट केवळ भावना व्यक्त करणे नसून त्या समाजापर्यंत पोहोचवणे, विचारांचे सौंदर्य उलगडणे आणि वाचकांना वैचारिक मंथनासाठी प्रवृत्त करणे हेही आहे. लेखनाचे विविध प्रकार, शैली आणि अभिव्यक्तीची माध्यमे यांचा उल्लेख करत त्यांनी संत ज्ञानेश्वरांपासून आधुनिक लेखकांपर्यंतच्या साहित्यपरंपरेचा संदर्भ दिला.
“लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. प्रतिभेच्या माध्यमातून केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न वाचकांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. चौकटी मोडून नव्या शैलीत मांडलेले साहित्य वाचकांना अधिक भावते. ‘मनातले पानावर’ हे पुस्तकही वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे आणि साहित्याचे सौंदर्य उलगडणारे ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित साहित्यप्रेमींनी पुस्तकाचे स्वागत करत लेखक कौस्तुभ परांजपे यांचे अभिनंदन केले. मित्रपरिवार, आप्तेष्ट आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुस्तक निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या भाग्यश्री सोनार,सिद्धांत फडणीस यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी परांजपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना साठी परांजपे परिवार व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
साहित्याचे सौंदर्य उलगडणारे ‘मनातले पानावर’ पुस्तक वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे – प्रा. शरदचंद्र छापेकर…कौस्तुभ सुधाकर परांजपे लिखित ‘मनातले पानावर’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..
RELATED ARTICLES
