महाशिवरात्रीनिमित्त’मनो-मित्र’तर्फे’शिव तत्व आणि मन’कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन
जळगांव – दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ‘मनो-मित्र’ टीमच्या वतीने नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात ‘शिव तत्व आणि मन’ या संकल्पनेवर आधारित एका विशेष कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अध्यात्म आणि मानवी मन यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून साधण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख सर उपस्थित होते. याप्रसंगी ‘मनो-मित्र’चे संस्थापक डॉ. राहुल येवले आणि ऑपरेटिंग डायरेक्टर डॉ. पल्लवी येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध कलागुणांचा आविष्कार
’शिव तत्व’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात गायन, नृत्य, कथाकथन आणि काव्यवाचन असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
टीम ‘मनो-मित्र’चा पुढाकार या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा व्यास आणि शिवानी खोडपे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल पाटील सर, डॉ.फेगडे,राहुल खरात,निलेश बोरा आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दैनंदिन जीवनात व्यासपीठ मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या कलाकारांना’मनो-मित्र’ने खऱ्या अर्थाने एक हक्काचा मंच उपलब्ध करून दिला.या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे आणि सादरीकरणाचे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.
