नागपूर, दि.१८ (धर्मसाथी लाईव्ह न्यूज)श्री.शांतिपुरुष सेवा संस्था,नागपूर आणि चैतन्यपीठ यू-ट्यूब चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक राजीव हिंगवे लिखित “एका भूवैज्ञानिकाची भ्रमण गाथा” या पुस्तकाचा भव्य प्रकाशन समारंभ रविवारी सायंकाळी शिवाजी सभागृह, शिवाजीनगर येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदूरचे अध्यक्ष परम पूज्य श्री बाबामहाराज तराणेकर यांनी भूषविले. मंचावर विशेष अतिथी म्हणून पुसद इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते. दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. नचिकेत प्रकाशनचे श्रीनिकेत सांबरे, जयाताई तारणेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
अविनाश वानखडे यांनी श्री बाबामहाराज तराणेकर यांनी स्कंदपुराण, गीता रहस्य, नर्मदा परिसराचा अतिशय सूक्ष्म भूगर्भ अभ्यास केला असल्याचे सांगत यू ट्यूबच्या माध्यमातून त्याची त्यांनी केलेली मांडणी हिंगवे यांनी पुस्तक रूपाने प्रकाशित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पौराणिक ग्रंथांत विपुल ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्यासाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली पाहिजे असे ते म्हणाले.
श्रीपाद अपराजित म्हणाले, भारतीय मनात परदेशी लोकांनी भरलेले मिथक पुसण्याचे काम हे पुस्तक करते. अतिशय कठीण विषय सोप्या भाषेत सांगनात आणि वाचकाना गुंतवून ठेवण्यात हे पुस्तक यशस्वी ठरले आहे. भूगर्भाचाअतिशय सूक्ष्म अभ्यास असलेले बाबामहाराज यांनी केलेले विवेचन नव्या पिढीपर्यंत जाण्याची गरज आहे.
बाबामहाराज तराणेकर यांनी ५० वर्षे भूगर्भ विज्ञान शी संबंधित त्यांचा झालेला अभ्यास, प्रवास आणि आलेले अनुभव यांचा उलगडा केला. या क्षेत्रासंदर्भात लोकांना फारसे माहिती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राजीव हिंगवे यांनी मनोगतातून पुस्तक लिहिण्यामागची भूमिका व्यक्त केले. श्री बाबामहाराज यांनी यू ट्यूबच्या माध्यमातून भूवैज्ञानिक माहिती पुस्तकरूपाने आणल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला नागपूरमधील साहित्यप्रेमी, अभ्यासक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. संजय पाठक, संदीप मोहरील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा शिनखेडे यांनी केले तर आभार साधना हिंगवे यांनी मानले.
……….
