जळगाव :- दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) निर्मल स्नेहप्रेम साहित्य समूह, जळगाव यांच्या तृतीय वर्धापन सोहळ्यानिमित्त दुसरे ऑनलाइन कविसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात नुकतेच संपन्न झाले. विविध ठिकाणांहून कवी-कवयित्री व साहित्यप्रेमी या संमेलनात सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सौ.वर्षा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.त्यांनी ध्यान व आत्मसाक्षात्कार विषयावर मार्गदर्शन केले.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सौ. मानसी प्रदीप म्हसकर,वडोदरा,गुजरात होत्या.प्रमुख पाहुण्या सौ.सोनाली जगताप यांनी साहित्यिकांना प्रेरणा दायी मार्गदर्शन केले.
संगीता महाजन यांनी प्रास्ताविक व स्वागताध्यक्ष म्हणून समूहाच्या साहित्यिक प्रवासाची माहिती देत उपस्थितांचे स्वागत केले.प्रमिला ब्राह्मणकर यांनी सादर केलेले स्वागतगीत विशेष आकर्षण ठरले.संध्या भोळे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले,तर कु.छाया उंब्रजकर यांनी आभार प्रदर्शन केले.
सर्व सहभागी कवी-कवयित्रींनी आपल्या सुंदर कविता सादर करून संमेलनाची रंगत वाढवली.नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या समूहाच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
“माझ्या एका हाकेला प्रतिसाद देत सर्वजण एकत्र आले आणि आपल्या प्रेमळ सहभागाने हा वर्धापन सोहळा आनंदमय व अविस्मरणीय केला,”असे भावना व्यक्त करत समूहाच्या संस्थापिका संगीता महाजन यांनी सर्व मान्यवर,कवी-कवयित्री व साहित्यप्रेमींचे आभार मानले.
