कोथळी,ता.मुक्ताईनगर ~ दि. ३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानपरिषद आमदार आ.एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित भक्ती, संस्कार,समाज प्रबोधना चा संदेश देणारा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा रविवारी कोथळी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.विविध राजकीय पक्षांतील मान्यवर नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि खडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“खडसेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले” — शरद पवार
यावेळी शरद पवार यांनी एकनाथराव खडसे यांच्या महाराष्ट्राची सेवा करणाऱ्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा आवर्जून उल्लेख केला. खडसे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली असून,विविध पदांवर काम करताना त्यांनी जनतेशी असलेले नाते कायम जपले, असे पवार यांनी नमूद केले.
विकासाचा अमृत महोत्सव ~ अरुणभाई गुजराथी..
आ.एकनाथराव खडसे अमृत महोत्सव स्वागत समिती अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की जे इतरांना अमृत देतात त्यांचा हा अमृत महोत्सव असून त्यांनी मागील ४० वर्षात अथक परिश्रम घेत कोणताही भेदभाव न करता जन सेवेसाठी केलेल्या समर्पित कार्याबद्दल ह्यासोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे. एकनाथराव या पेक्षा नाथाभाऊ समाजाला व आम्हाला अधिक जवळचे वाटले.नाथाभाऊ म्हणजे ज्वालामुखी सारखे प्रखर आक्रमक व्यक्तिमत्व आहे.चार दशकांपासून विधान सभेत केवळ मतदार संघाचेच आमदार नव्हे तर सम्पूर्ण महाराष्ट्राचे आमदार या पातळीवर त्यांनी अनेक समस्या सोडवून असंख्य विकास कामे केली आहेत.समाजाचा आवाज बनून प्रखर विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावली आहे.अश्या संघर्ष दिपाला अच्छाई करने पर भी ..त्रासाला सामोरे जावे लागले.तरी देखील त्यांचा कार्यकर्तृत्वाचा प्रवास अखंड सुरू आहे.अश्या आदर्श व्यक्तिमत्वाचा आजचा सर्व पक्षीय व्यक्तींनी एकत्र येवून साजरा करत असलेला हा कृतज्ञता सोहळा विकासाचा अमृत महोत्सव आहे.
कोथळीपासून विधानसभेपर्यंतचा प्रवास
अमृत महोत्सवी सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना आ.खडसे यांनी ७५ वर्षांच्या जीवनप्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला.कोथळीसारख्या छोट्या गावातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून ग्राम पंचायत, सरपंच पद, पंचायत समिती सदस्य आणि त्यानंतर विधानसभा असा आपला प्रवास झाल्याचे त्यांनी सांगितले. १९७८ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव झाल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.पुढे सात वेळा विधानसभेवर निवडून येण्याची संधी मिळाली आणि मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली, असे खडसे यांनी नमूद केले.
“शरद पवारांनी साथ दिली म्हणून उजेडाचे दिवस पाहता आले”
आपल्या राजकीय जीवनातील चढ-उतारांचा उल्लेख करताना खडसे भावूक झाले.“राजकीय जीवनात अनेक अडचणी आल्या.मात्र शरद पवारांनी मला साथ दिली. त्यामुळे आज हे दिवस मी पाहत आहे. अन्यथा मला अंधारातले दिवस पाहावे लागले असते; उजेडाचे दिवस मी कधी पाहिले नसते,”अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तापी,गोदावरी आणि कृष्णा खोरे महामंडळांच्या निर्मितीसह जलसिंचनाच्या कामांना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.राजकारणात मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये, अशी भूमिका आपण कायम जपल्याचेही खडसे यांनी सांगितले.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
अमृत महोत्सवी सोहळ्यामुळे कोथळी येथे राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले,केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,खा.भास्कर भगरे, माजी मंत्री जयंत पाटील,अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात,राजेश टोपे,राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील,दिलीप वळसे पाटील,गुलाबराव देवकर, आ.किशोर दराडे,अभिजित पाटील,जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्ष मंदाकिनी खडसे,शारदा खडसे,माजी आ.बी एस पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,साहेबराव पाटील,ॲड.रवींद्र पाटील,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,इंदिराताई पाटील,आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती राहिली. खडसे यांच्या ७५ वर्षांच्या राजकीय-सामाजिक प्रवासाचा गौरव करणारा सोहळा जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला.या भावस्पर्शी सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प विशाल महाराज शेळगावकर,प्रास्ताविक विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.
‘ नाथ पर्व’- लोकनेते नाथाभाऊंच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन
लोकनेते आ.श्री.एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी लिखित आणि मल्टी मीडिया फिचर्स प्रा. लि. प्रकाशित ‘नाथ पर्व’ या पुस्तकाचे या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
गेल्या ४० वर्षांच्या पत्रकारितेच्या अनुभवातून डॉ. दिलीप तिवारी यांनी नाथाभाऊंचा संघर्ष, राजकीय वाटचाल, नेतृत्वगुण आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान अत्यंत प्रभावीपणे या पुस्तकात मांडले आहे.’नाथ पर्व’ हे नाथाभाऊंच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी राजकीय जीवनाचा सविस्तर वेध घेणारे पुस्तक आहे.
नाथ अक्षर पुस्तकाचे प्रकाशन
लोकनेते आ.एकनाथराव खडसे यांच्या जीवनकार्याा तील अनेक आठवणी,अनुभव तसेच माणुसकीच्या सहवासातून उलगडलेले नाथाभाऊ यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या संपादक प्रा.डॉ. सुनिल नेवे संपादित व अथर्व पब्लिकेशन द्वारा निर्मित पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
कोथळीच्या येथून सुरू झालेला प्रवास, संघर्ष, जनसेवा आणि प्रदीर्घ राजकीय कारकीर्द यांचा गौरव करणारा हा भव्य अमृत महोत्सवी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
