नवी मुंबई,– दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) श्रीलंका हा देश भारतातील एका राज्याइतकाच मोठा असला तरी तेथे नेत्रदानाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.मात्र,जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण अवघे १० ते १२ टक्के असून,ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याची खंत लेखक व पत्रकार राजेंद्र घरत यांनी व्यक्त केली.
वांगणी येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्रात दृष्टीहीन वाचकांसाठी घरत लिखित ‘लेकुरे उदंड झाली’ (३४ वे) आणि ‘प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा’ (३५ वे) या ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी प्रा. एकनाथ जाधव, विद्यानिकेतन संगीत विद्यालयाच्या संचालिका सुरेखा थिगळे, डॉ. श्रद्धा सोमण, विभावरी तरटे, शुभदा बोराडे तसेच देशमुख पर्यटन केंद्राचे प्रमुख दिलीप देशमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र घरत यांनी मृत्यूनंतर डोळे, यकृत आणि अन्य मानवी अवयव जाळून टाकण्यापेक्षा त्यांचे अवयवदान केल्यास अनेकांना नवजीवन मिळू शकते, असे सांगत समाजाने नेत्रदान व अवयवदानाबाबत जागरूक होण्याचे आवाहन केले.
‘लेकुरे उदंड झाली’या ब्रेल पुस्तकाचे प्रकाशन करताना सुरेखा थिगळे यांनी दृष्टीहीनांच्या संगीत साधनेचे कौतुक केले.तर‘प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा’या पुस्तकाचे प्रकाशन प्रा.एकनाथ जाधव यांच्या हस्ते झाले.यावेळी त्यांनी घरत यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.डॉ.श्रद्धा सोमण,शुभदा बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
