
जळगाव – दि.2 (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
दिव्यांग व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवणारे हे भारत विकास परिषदेचे निस्वार्थी,सेवाभावी प्रेरणादायी कार्य पाहून मी भारावलो आहे असे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांनी प्रतिपादन केले.
भारत विकास परिषद जळगाव शाखा व दिव्यांग केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रॉकेट सॉफ्टवेअर यांच्या सहकार्याने रविवार १ मार्च रोजी सकाळी १० वाजता केमिस्ट भवन मध्ये आयोजित दिव्यांग महाशिबिरात ते बोलत होते.
आ. राजूमामा भोळे यांनी दृष्टी सगळ्यांकडे असते मात्र दृष्टिकोन नसतो, भारत विकास परिषद व रॉकेट सॉफ्टवेअर यांच्याकडे दिव्यांगांना मदतीचा दृष्टिकोन आहे असे सांगितले.
रॉकेट सॉफ्टवेअरचे वरिष्ठ संचालक ललित माहेश्वरी यांनी भारत विकास परिषदेत दिव्यांग बद्दल समर्पणाची भावना असून या शिबिरात आपुलकीची भावना व सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे.
आम्ही सहानुभूती,मानवता,विश्वास आणि स्नेह या चतुसूत्रीवर कार्य करतो.आमच्यासाठी ही सीएसआरची घटना नसून सेवेची संधी आहे असे आम्ही मानतो असे ते म्हणाले.
शिबिरात डॉ. विजय नाईक व त्यांच्या सहकारी तंत्रज्ञाचा आणि संपर्क फाउंडेशनच्या राजी नायर व दिव्या चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.या महाशिबिरात ५०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या पायाचे,हाताची मोजणी करण्यात आली असून ४५ दिवसांनी त्यांना कृत्रिम मॉड्युलर हात, पाय ह्यांचे मोफत वितरण होणार आहे.त्यासाठी सीएसआर अंतर्गत पुणे येथील रॉकेट सॉफ्टवेअर यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभले.
आहे.प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख तुषार तोतला यांनी तर सूत्रसंचालन महेश कापुरे यांनी केले. वंदे मातरम प्राजक्ता दंडगव्हाळ यांनी तर आभार शाखा अध्यक्ष हेमांगिनी महाजन यांनी व्यक्त केले.
दिव्यांगांच्या मोजमाप व इतर व्यवस्थांसाठी गोदावरी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, युवाशक्ती, रेडक्रॉस सोसायटी,विश्व हिंदू परिषद,राष्ट्रीय छात्र सेना, शासकीय महाविद्यालय ऑफ आयुर्वेद अँड होमीओपॅथी, पी. ई.तात्या पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या संस्थांच्या विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. त्यासाठी प्रकल्प समन्वयक चिन्मय खटावकर यांनी नियोजन केले.
शिबिरातील लाभार्थींसाठी रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड आणि आकाशवाणी चौक येथून येण्या – जाण्याची वाहनाद्वारे व्यवस्था आणि लाभार्थी व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीसाठी चहा, नाश्ता व भोजनाची सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आली होती.
शिबिरासाठी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, ॲड. किशोर पाटील, रजनीकांत कोठारी, घमेंडीराम सोनी, सुबोध चौधरी, विजय सोनार, रवींद्र जोशी, चेतन दहाड, नितेश मैदसानी, अमर कुकरेजा, संजय पवार, वंदना इंगळे, निखिल मेशरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक प्रकाश बालाणी,सुचिता हाडा, दीपक सूर्यवंशी, वंदना इंगळे, डॉ.केतकी पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, रवींद्र लढ्ढा, डॉ. राहुल मयूर, डॉ. धर्मेंद्र पाटील, विनोद बियाणी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
दिव्यांगांच्या नोंदणी, कागदपत्र पडताळणीसह यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेच्या सर्व सदस्यांसह यांच्या परिवारातील व्यक्तींनी परिश्रम घेतले.
