जळगाव-(धर्मसाथी मीडिया नेटवर्क )
ना कोणाच्या अभावाने जगलो..ना कोणाच्या प्रभावाने जगलो..हे जीवन हे जीवन फक्त दुसऱ्याच्या सेवेसाठी ..आम्ही फक्त आमच्या स्वभावाने जगलो…या प्रमाणेच सदैव दुसऱ्यासाठी झटणारे गीतेतील निष्काम कर्मयोगा प्रमाणे कोणतीही अपेक्षा न ठेवता जनसामान्यांच्या सेवेत रममाण होणारे कोळी समाजातील असामान्य व कृतिशील,सेवाभावी व्यक्तिमत्व स्व.रविभाऊ ठाकरे यांनी दिनांक १० डिसेंबर रोजी जगाचा निरोप घेतला पण त्यांच्या सहवासातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घट्ट , प्रेमाला,पाठबळाला,सहवासाला कधीही विसरू शकणार नाही.असे असामान्य कार्य कर्तुत्व सर्वांना घेऊन चालण्याची शिकवण देणारे गोरगरिबांसाठी हृदयात नेहमी आपुलकी व माणुसकीचा झरा खळखळत ठेवणारे..प्रत्येकाशी जिव्हाळा जपणारे त्यांचे जगणे त्यांचे वागणे त्या उत्तम गुणांचा समुच्चय असलेला आरसा आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी ठेवून गेले आहेत,अनेकांचा आधारस्तंभ भूमिकेत असलेले स्व.रविभाऊ यांच्या निधनाने एक सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे.
प्रत्येक माणूस हा जीवनाला वेगवेगळ्या स्वरूपात बघत व अनुभवत असतो.स्व. रवी भाऊंनी देखील अगदी लहानपणापासून वेगळेपणाने जीवनाकडे बघण्याची सवय जणू लावून घेतली होती. कुटुंबात त्यांचे आदरणीय स्व.वडील त्यांच्या पाठोपाठ मोठी बहीण सुमनताई यांच्या राजकीय वारस्यातून केलेल्या संघर्षमय वाटचालीत अनेक खडतर प्रसंग टक्के टोणपे खाल्लेल्या बऱ्या वाईट अनुभवांची मोठी शिदोरी त्यांचे जवळ होती.
मात्र त्यातून सकारात्मकता अंगी बाळगून घराण्याच्या सामाजिक सेवेचा जगन्नाथाचा रथ त्यांनी मोठ्या हिमतीने व जबाबदारीने ओढला.ठाकरे परिवार कुटुंबीय भाऊ ,बहिणी,भाचे ,पुतणे सदैव त्यांच्या पाठीशी उभे असायचे व त्यांचा सदैव आदर करायचे.
स्व.रवी भाऊंनी माणसं जोडण्याची कला अंगी बाळगलेली होती व त्यातून निर्माण झालेला संपूर्ण जिल्हा तालुक्यासह जिल्हाभरात मोठा राजकीय व्यक्ती विविध क्षेत्रातील जन सामान्य व्यक्तींशी,मान्यवर व्यक्ती यांचा जनसंपर्क व लोकसंग्रह त्यांच्या सेवाभावी व्यक्तिमत्त्वाची शोभा वाढवित होता..
पैसा कमवण्यापेक्षा माणसं कमवणे यावर त्यांनी भर दिला त्यातूनच त्यांचे विशाल सेवाभावी,जिव्हाळा असलेले सामाजिक सेवा भावी व्यक्तिमत्व परिवारास व समाजास प्रेरणादायी ठरले आहे.
ध्येयासाठी जोष व जिद्द ठेवा..परिश्रमाचे मेहनतीच फळ यशच असतं.. हा त्यांचा विचार सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देत होता गतिमान करत होता. सदैव ते काम घेऊन आलेल्या प्रत्येक माणसाला सांगायचे की कोणतेही काम करताना गांभीर्य ठेवा.. परिश्रम घेण्याची तयारी ठेवा,फॉलोअप सोडू नका पाठपुरावा हा तुम्हाला एक दिवस यशाकडे नेईलच ही खात्री त्याला ते देत असत.त्या माणसात पाठपुरावा करण्याची वृत्ती रुजवण्यावर ते भर देत असत. जिंकायचे असेल तर अपयशाची पराभवाची हारण्याची भीती मनातून काढून टाका निर्भय व्हा.. असा संदेश ते देत असत. सामाजिक विचारसरणी अंगी बाळगणारे स्व.रवी भाऊ नेहमी आपल्याला आर्थिक स्थितीने कमकुवत व दुर्बल दुर्बल समजणाऱ्या व्यक्तीला सांगायचे की परिस्थिती गरीबीची असली तरी विचार भिकारी नसावेत नेहमी मोठ्या मनाने जगा आनंदाने जगा “हसा आणि हसवा” असा आग्रह ते करीत असत.
स्व.रवी भाऊंची बोलण्याची एक विशिष्ट शैली होती नेहमी दुसऱ्याचा आदर राखून ते बोलत असत व मुक्तपणे त्यांचे विचार मांडण्याचे अफाट सामर्थ्य त्यांच्याजवळ होते त्यात फिल्मी हिंदी डायलॉग, मराठी म्हणी विनोद याचा समावेश असायचा अशा सुंदर बोलण्यातून ते समोरच्या व्यक्तीचे मन केव्हा जिंकून घेत असत हे त्याला लवकर लक्षात सुद्धा येत नव्हते. येवढी कुशाग्र बुद्धी रवी भाऊंच्या जवळ होती. कधीही ताण-तणाव न बाळगता खंबीर व कणखर भूमिके वर भर असायचा. शारीरिक आणि अडचणी निर्माण होऊन देखील त्यांचे कणखर मनावर त्याचा कोणताही परिणाम कधीही दिसून येत नव्हता.मधुमेहासारखी व्याधी शरीरात फोफावत असताना देखील त्याची भीती न बाळगता त्यांची अखंड वाटचाल कधीही थांबत नव्हती.
स्व.रवी भाऊंच्या घरी काम होण्यासाठी गेलेला माणूस कधीही रीत्या हातांनी परतला नाही. त्यांचे समाधान पूर्ण होण्यासाठी ते सदैव त्याचा कामासाठी पाठपुरावा करत असत.
त्या माणसाला कामा विषयी ते स्वतः आठवण देत असत त्याला फोन करून आज तिथे जायचे आहे असा आग्रह करत असत हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल.
कायद्याचे, इतिहासाचे, नैसर्गिक औषधींचे विशेष ज्ञान त्यांना अवगत होते. त्यांच्या मौल्यवान व अनुभवी सल्ला घेण्यासाठी अनेक व्यक्ती त्यांच्या संपर्कात येत असत वर्षभरातील लग्नकार्यांना प्रत्यक्ष भेट देऊन हजेरी तसेच मृत्यूची घटना घडल्यानंतर सांत्वन करण्यासाठी रोज संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरात त्यांचा लांब अंतराचा प्रवास ते नेटाने करीत होते.
कोणताही भेदभाव मनात न ठेवता त्या त्या संबंधित व्यक्तींना आपल्या ओळखीचा कसा उपयोग होईल त्यांना त्यातून काय सहकार्य देता येईल असा विचार करून ते पाठबळ देत असत. सहवासातील अनेकांना याचा लाभ झालेला आहे.त्याची आठवण झाल्या शिवाय रहात नाही.
सामाजिक कार्य करतांना कोणालाही न दुखवता ते कार्यावर भर देत असतात गणेशोत्सव ,नवरात्र ,श्री वाल्मिक जयंती या सारख्या कार्यक्रमांना दरवर्षी ते कुटुंबासह सक्रिय सहभागी होऊन युवा पिढीला प्रोत्साहित करीत असत. दरवर्षी त्या उत्सवात नवीन संकल्पना कशी रुजवता येईल त्यावरती त्यांचे प्रयत्न असायचे.
आरोग्य व वैद्यकीय सेवेत रुग्णांच्या परिवाराला धीर देणे सल्ला मार्गदर्शनातून त्यांची मोठी मदत त्या कुटुंबाला मिळाल्याने अनेक कुटुंबांनी त्यांच्या सामाजिक जाणीवेची अनुभूती घेतलेली आहे. अशा अनेक विविधांगी भूमिका वठवून या सेवानायकाने आपले नाव अजरामर केले आहे त्यांना कोणीही कधीही विसरणार नाही या दृष्टीने महान कार्याचा ठेवा त्यांनी उभारून ठेवला आहे.
त्यांचा सामाजिक व धार्मिक व राजकीय वाटचालीचा वारसा ठाकरे कुटुंबात शोकाकुल — श्रीमती.सुमनताई ठाकरे(माजी नगरसेविका)यांच्या मार्ग दर्शनाखाली श्री.शैलेश आप्पा ठाकरे,गुणवंत ठाकरे,राहुल ठाकरे(मोगली बाबा),रितेश ठाकरे,कल्पेश ठाकरे निलेश ठाकरे,हितेश ठाकरे,आशिष ठाकरे(जळगाव) हे सर्व कुटुंबीय या पूर्वी देखील जपत होते व या पुढेही जपतील यात शंका नाही.. सरते शेवटी ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती दोन दिसाची गंमत जंमत दोन दिसाची नाती”…परमेश्वर रवी भाऊंच्या पवित्र qआत्म्याला चिरशांती देवो हीच मित्र परिवाराकडून प्रभू चरणी प्रार्थना..
शब्दांकन – प्रसाद जोशी,संपादक -धर्मसाथी
