अमळनेर – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
शिवसेनेच्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.अमळनेरमध्येही लाडक्या बहिणींच्या आशिर्वादाने अमळनेर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल,असा विश्वास शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
अमळनेर येथे घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री दादाजी भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अमळनेर नगर परिषदेसाठी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.परिक्षीत बाविस्कर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
खासदार डॉ.शिंदे म्हणाले की,जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्रात मोठी क्रांती झाली.पाईपद्वारे गावागावात पाणी पोहोचवण्याचे काम शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून झाले.अमळनेरचा पाण्याचा प्रश्न देखील मंत्री गुलाबराव पाटील सोडवतील ,असा विश्वास खासदार डॉ.शिंदे यांनी व्यक्त केला.
अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी आहे.या शहरात साने गुरुजींचे स्मारक करु,असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.अमळनेरच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही,अशी ग्वाही खासदार डॉ.शिंदे यांनी दिली.
लाडक्या बहिणींकडून खासदार डॉ. शिंदेंचे औक्षण
अमळनेरमधील लाडक्या बहिणींनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सभेपूर्वी औक्षण केले. यामध्ये मुस्लिम समाजातील लाडक्या बहिणींचा समावेश होता. लाडक्या बहिणींचा आशिर्वाद ही शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरु केलेली लाडकी बहिण योजना कदापी बंद होणार नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
