Monday, February 23, 2026
Homeताज्या बातम्याअसा दादा होणे नाही - जेष्ठ पत्रकार अनिल पालीवाल..

असा दादा होणे नाही – जेष्ठ पत्रकार अनिल पालीवाल..

जळगांव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाराष्ट्र राजकारणातील एक धडधाकट व अग्रणी व्यक्तिमत्व,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचं विमान अपघातात आलेला मृत्यू…संपूर्ण राजकीय क्षेत्राला हादरा देणारी आजची  दुर्दैवी दुर्घटना…

दादांशी चोपड्याचं नातं अगदी जवळचं… श्री.शरद पवार साहेब यांचं श्री अरुणभाईंशी असलेल्या मैत्रीतून हे नातं अधिकच विकसित होत गेलं….अजितदादांना आम्ही अजातशत्रू दादा म्हणत होतो… पक्षीय विरोध झुगारून अनेक कामं त्यांनी करत आपला गोतावळ निर्माण केला.त्यांचा कार्याचा तडाखा अमिट व अविस्मरणीय राहिल….दादांशी दोन वेळा भेटीचा योग आला..

त्यांच्या अनेक कार्यक्रमांच्या बातम्या वृत्तांकन केल्या…त्याचं हसरं व आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर नेहमीच उभे राहिल….पवार घराण्याचा राजकीय वारसा अगदी शिस्त व दमदारपणे त्यांनी चालवला होता. अजित दादा अजितच होते….लोकसभेच्या निवडणुकीत सौ. सुनेत्रा पवार यांच्या पराभवावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच बोलकी व भावकी जोपासणारी होती….दादा कधी खचले नाही…हसत खेळत राजकीय सारीपाटावर आपल्या बुद्धिबळावर दादा नेहेमी जिंकत होते.एक हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व लाभलेले दादा महाराष्ट्राच्या राजकारणातले चमकता सितारा होते.

सतत विकासाचा ध्यास,नवनवीन प्रकल्पाचा अभ्यास करणारे दादा कोणत्याही नफा नुकसानीचा विचार न करता बेधडकपणे काम तडीस नेणारे एकमेव नेतृत्व म्हणजे फक्त अजितदादा.. संपूर्ण महाराष्ट्र व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष तोंड ओळख असलेले ,जवळीक असलेले दादा नेहमीच सडेतोड आणि तितकेच सर्वांना आदरणीय होते.अजितदादा संकटाला न भिता सदैव सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते होते.त्यांची आपल्यातून झालेली एक्सिट आपल्या सर्वांना चटका देऊन जाणारी आहे. सकाळी सव्वा नऊला टी व्हि सुरू करताच दादांच्या अपघाताची बातमी ऐकताच अगदी निःशब्द झालो…व…त्यांच्या अपघाताच्या विमानाचे दृश्य पाहताच स्तब्ध व अवाक झाल्याने काही सुचेनासे झाले…आमचे समवयस्क दादा असे अचानक आपल्यातून निघून जातील, ही कल्पनाच करवत नाही.अफाट लोकसंग्रह असलेला नेता आज आपल्यातून निघून जाणं, हे निश्चित दुर्दैव म्हणावं लागेल….दादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली…

– अनिलकुमार पालीवाल (ज्येष्ठ पत्रकार,नाशिक)

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या