जळगाव – दि.१४(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जो करील नियमित रक्तदान तो राहील सदैव स्फूर्तीवान..आज १४ जून जागतिक रक्तदाता दिवस. रक्त संक्रमणाची कहाणी वर्षानुवर्षे जुनी असून सुरक्षित आणि प्रभावी तंत्रे विसाव्या शतकात उदयास आली असून सन १९४० मध्ये कार्ल लँडस्टाईनर शास्त्रज्ञाने विविध रक्तगटांचा शोध लावला त्यांच्यामुळेच अनेकांचे जीव वाचले आहेत,तसेच त्यांच्या शोधामुळे सुसंगत रक्त संक्रमणाचा मार्ग मोकळा झाला. यामुळे रक्तदान आधुनिक वैद्यक शास्त्राचा एक आधार बनला, रक्तदात्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेला समजून घेत जागतिक आरोग्य संघटनेने सन २००४ मध्ये जागतिक रक्तदाता दिनाची स्थापना केली.
हा दिवस कार्ल लेंडस्टाईनर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दिवशी रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान आणि गुणगौरव होऊन सर्वांना रक्तदान कार्याची प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश हेतू आहे असं मला वाटत. रक्तदान करण्याने कुठलाही त्रास वा अशक्त पणा कधीच येत नाही तर रक्तदान करण्याचे मोठे फायदे आहेत आपल्या एका रक्तदानाने विविध घटक तयार होत असल्याने एकाच वेळी अनेकांना जीवनदान मिळते,नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, लोहाची पातळी कमी होत असल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो,नियमित रक्तदान केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारू शकते, रक्तदान केल्याने समाधान आणि मानसिक आरोग्य लाभते, रक्तदान केल्यानंतर पुन्हा नवीन पेशी तयार होत असल्याने उत्साह वाढतो,रक्तदानाला अतिशय अल्पसा वेळ लागतो आपल्या शरीरात ६ ते ७ लिटर पर्यंत रक्त असते आपण एका वेळेस (३५० एम.एल.) पाव लिटर रक्त देतो याचा कुठलाही त्रास होत नाही.
आपण दिलेले रक्त दिवसभरात आपोआप भर करून घेते तसेच रक्तदान केल्यानंतर विशेष आहाराची आवश्यकता नसून आपण साधारण जे नेहमी जेवण करतो खातो ते सुद्धा खाऊ शकतो. साधारण अठरा ते साठ वय ,पन्नास किलो वजन असलेले कुणीही युवा, प्रौढ सहज रक्तदानाच्या पावन कार्यात सहभागी होऊ शकतात.मला लहानपणी पोलिओ आजाराने शारीरिक अधूपण आले,मोठा अपघातही झाला होता पण मन हृदयाने पूर्णतः सशक्त सुदृढ असल्याने (व्यंग शारीरिक असते मनाचे नव्हे) जवळपास तीस वर्षांपासून सामजिक,आरोग्य,रक्तदान सेवेत अखंड सेवारत असून आतापर्यंत आरोग्य व रक्तदान सेवेची निस्वार्थ संधी लाभल्याने मला अनेक परिवाराचे शक्ती स्वरूप सदैव आशीर्वाद लाभल्याने नेहमी व्याधीमुक्त जीवन लाभले आहे.
वाढते अपघात,गंभीर रुग्ण,थैलेसिमिया, हीमोफिलिया ,सिकलसेल आजाराने त्रस्त रुग्ण, रक्तक्षय,गर्भवती असलेल्या तथा – प्रसूती करिता आलेल्या माता आदींना नेहमी सुरळीत रक्तपुरवठा गरजेचा असतो तप्त उन्हाळ्यात बऱ्याचदा रक्तपुरवठा खंडित होतो. आपल्या जिल्हा,शहराची लोकसंख्या पाहता प्रत्येकाने वर्षात किमान दोन-तीन,चार वेळा रक्तदान केल्यास रक्ताची कधीच अडचण येणार नाही. काही ठिकाणी रक्तदानाबद्दल खूप गैरसमजही आहेत तेही जनजागृती करून दूर झाले पाहिजे. मी आज नियमित स्वयंभू रक्तदान करीत असल्याने मला सदैव उत्साह,आनंद,स्फूर्ती लाभली आहे.मला कुठलाही पौष्टिक आहार लागत नाही. जे काही पोळी भाजी भाकरी असेल तो आहार घेतो.
सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनाची आज गरज असल्याने रुग्णाना व्याधीमुक्त राहण्या करिता, तसेच आजार विरहित रक्त घेण्यासाठी नॅट टेस्टेड रक्त सुरक्षित असते,शासकीय व मान्यता प्राप्त रक्तकेंद्रातूनच रक्त घ्यावे. रक्तदान स्वार्था पोटी किंवा काही मिळेल या अपेक्षेने न करता निस्वार्थ भावनेने केले पाहिजे.
चला मग आपणही माझ्याकडे पहा
मला मोठा शारीरिक त्रास असूनही मी जसे नियमित स्वयंभू रक्तदान करतो तसे आपणही करा आनंदी आणि उत्साही रहा.
मुकुंद गोसावी ब्रँड ॲम्बेसेडर (आरोग्य सेवा)
रक्तदान जनजागृती कार्य.
अध्यक्ष – मुक्ती फाउंडेशन जळगाव.
