Tuesday, October 7, 2025
Homeताज्या बातम्या३५० वर्षाची परंपरा लाभलेला भवानी गड.. भाविक भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू..नवरात्र उत्सवात विविध...

३५० वर्षाची परंपरा लाभलेला भवानी गड.. भाविक भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू..नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन..

जळगांव दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाराष्ट्र थोर संतांची परंपरा लाभलेलं,छत्रपती शिवरायांचा वारसा जपणारे राज्य या राज्याची धार्मिक परंपरा,ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्यातील असाच एक भाग म्हणजे पूर्व खान्देश पूर्व खानदेशातील जळगाव जिल्ह्यापासून 55 किमी अंतरावर असलेलं पारोळा हे तालुक्याचे ठिकाण! पारोळा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर..पेशवाई कालीन भुईकोट किल्ला आणि पुरातन बालाजी मंदिराचा रथोत्सव ही शहराची प्रमुख वैशिष्ट्ये. राणी लक्ष्मीबाई या तांबे घराण्यातल्या त्यांचे पती गंगाधरराव यांनी आपला चुलत भाऊ सदाशिवराव नेवाळकर यांना पारोळा शहर जहागीर म्हणून भेट दिले. आणि नेवाळकरांनी सतराव्या शतकात पारोळा शहराची स्थापना केली.पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीतच पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली.पारोळ्याचा भुईकोट किल्ला जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी  1727 मध्ये बांधला.शहराच्या ईशान्य बाजूस स्थित भवानीगड म्हणजेच आदिशक्ती झपाट भवानी मातेचे पुरातन मंदिर पारोळा शहराचे आणखीन एक वैशिष्ट्य.३५० वर्षाचा इतिहास असलेलं हे जागृत देवस्थान असंख्य भाविकांच्या श्रध्देचे प्रतीक आहे.हे मंदिर जहागिरदार श्री.त्र्यंबकराव सदाशिवराव यांनी बांधले.त्यांचा बैठा पुतळा मंदिरात आजही पाहावयास मिळतो.या मंदिरात चार हात असलेली देवीची प्राचीन मूर्ती पाहावयास मिळते.जागृत देवस्थान म्हणून जिल्हाभरात मान्यता लाभलेलं हे मंदिर आहे.एका घटनेमुळे या मंदिरावरही पारतंत्र्याचे सावट पडले. त्याचा इतिहास रोचक आहे.1857 च्या राष्ट्रीय उठावात ब्रिटिशां विरुद्ध बंड केल्याने भुईकोट किल्ल्यासह हे मंदिरही इंग्रजांनी ताब्यात घेतले होते. मात्र सन 1861 मधे धुळे कोर्टाने मंदिराचा ताबा राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे तत्कालीन वंशज श्री आप्पाजी केशव तांबे यांना वारसदार म्हणून मंदिराचा ताबा दिला. तेव्हापासून मंदिर संस्थानची संपूर्ण व्यवस्था तांबे कुटुंबाकडे आहे. मंदिराची प्रचंड पडझड झाल्यामुळे 2000 सालापासून पारोळा शहराचे नगरसेवक आणि झपाट भवानी गजानन महाराज संस्थान अध्यक्ष आण्णासाहेब मंगेश सुधाकर तांबे यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले. आणि पुरातन मंदिराला भव्यता प्राप्त झाली. जुनी मूर्ती देवीची – दगडाची होती. आता संगमरवरी मूर्ती बसविण्यात आलेली आहे.तेथे एक सुंदर नक्षीकाम केलेली छ्त्री प्रवेशद्वाराजवळच आहे. या मंदिरात गणपतीची मूर्ती देखील आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेस देवीची यात्रा भरते. त्यावेळी पतंग महोत्सव आयोजित केला जातो. देवीच्या भक्तांकडून माणसांनी भरलेल्या बैलगाड्या ओढण्याचा चित्तथरारक कार्यक्रमही यावेळी प्रेक्षणीय ठरतो.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या