
जळगाव – दि.१२(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)श्रीसाई मासिक संगीत सभेत सुश्री संपदा छापेकर यांनी सादर केलेल्या नंद रागाने आणि विविध भक्ती गीतांनी मैफिलीत रंग भरला.
कार्यक्रमाची सुरुवात राग नंद मधील बंदिशिनी झाली.
“मेरो साईनाथ स्वामी तेरी महिमा अगाध लीला अपरंपार,दरसन दीजे कृपा कीजे संपदा पर राखो मोरी लाज!!या विलंबित ख्यालाने राग आनंदी कल्याण अर्थात राग नंद ने संपदा छापेकर यांनी आपल्या गायनास प्रारंभ केला.
या विलंबित एकतालातील ख्यालानंतर द्रुत एकतालातील
“ध्यान धरो रे मनवा नित सुमीरन ध्यान जाप करो साईनाथ का,सबुरी और श्रद्धासे साईनाथ को ध्यावो
मंगल गावो,नित सुमीरन ध्यान जाप करो साईनाथ का,ही रचना सादर केली गेली.
शास्त्रीय ख्याल गायनानंतर संपदाने नमिला गणपती,रुणुझुणु रे भ्रमरा,अबीर गुलाल ,नारायणा रमा रमणा ही भक्तीगीते,नाट्यगीते सादर केलीत.संत गजानन,स्वामी समर्थ,संत रोहिदास यांच्यावरील स्वरचित काही रचना देखील सादर केल्या.भावभक्ती रसपूर्ण अशा या मैफिलीची सांगता आजि सोनियाचा दिनु या संत ज्ञानेश्वर रचित भैरवीने झाली.
संवादिनीवर श्री.दुष्यंत जोशी यांनी तर तबल्यावर राहुल कासार यांनी उत्तम साथ संगत केली.संगीत सभेचे समर्पक निवेदन सौ.आशा जोशी यांनी केले.दर्दी रसिक श्रोते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी श्री साई बाबा मंदिरा तर्फे कलाकारांचा उचित गौरव करण्यात आला.
