
जळगांव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क )दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया मुंबई विभागाच्या कार्यकारी मंडळाने बुधवार दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जळगाव सी.ए. शाखेस भेट दिली. सदर कार्यक्रम सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता. दिवसभर विविध उपक्रम, संवाद आणि प्रेरणादायी सत्रांनी हा दिवस संस्मरणीय ठरला.
जळगाव सी. ए. शाखेस भेट देण्यासाठी मुंबई डब्लू. आय. आर. सी. विभागाचे मा. अध्यक्ष सी. ए. केतन सैया, उपाध्यक्ष सी.ए. पियुष चांडक, कोषाध्यक्ष सी.ए. फेनिल शाह व जळगाव सी.ए. शाखेचे नॉमिनी आर.सी.एम. सी.ए. अभिषेक धामणे तसेच आदी मान्यवर यांचे आगमन झाले. या वेळी मान्यवरांच्या स्वागतासाठी जळगाव सी. ए. शाखेचे अध्यक्ष सी. ए. हितेश आगीवाल, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल, सेक्रेटरी सी.ए. सोहन नेहेते, कोषाध्यक्ष सी.ए. लक्ष्मिकान्त लाहोटी, कार्यकारी मंडळ सदस्य सी.ए. नचिकेत जाखेटीया, संयुक्त सदस्य सी.ए. हितेश जैन तसेच जळगाव सी. ए. शाखेचे सर्व माजी अध्यक्ष आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसाची सुरुवात पांजरापोळ गौशाळा येथे “सामुहिक गौसेवा एक अनुष्ठान” यासाठी गौ सेवाव्रती अॅड. श्री. विजय काबरा यांच्या सोबत गौसेवा करण्यात आली. तसेच मुंबई डब्लू.आय.आर. सी. टीमतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर मा.ना.श्री. गुलाबराव पाटील,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री,जळगाव जिल्हा यांच्या हस्ते GPS कॅम्पस, पाळधी येथे अकाउन्टीग म्युजिएम चे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांनी आपले मनोगत मांडताना अकाउंटिंग म्युजिएम हे संग्रहालय केवळ अकाउंटिंगच्या इतिहासाची झलक दाखवणारे केंद्र नसून,ज्ञान,पारदर्शकता आणि व्यावसायिकतेचे प्रतीक आहे.हे संग्रहालय विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही लेखा व्यवस्थापनाची समज वाढवेल, तसेच आपल्या देशातील आर्थिक प्रवासाचा इतिहास समजून घेण्यासाठी हे एक मौल्यवान साधन ठरेल. जळगाव शाखेचा हा उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशातील ICAI शाखांसाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.
यानंतर जळगाव सी.ए. शाखेत आल्यावर शाखेच्या व्यवस्थापन समितीमार्फत सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्या नंतर अध्यक्ष सी. ए. हितेश आगीवाल यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व मान्यवरांची थोडक्यात ओळख करून देऊन आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले. जळगाव शाखा नेहमीच सदस्य व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आग्रही राहिली आहे. शिक्षण, प्रशिक्षण, तांत्रिक सत्रे, तसेच सामाजिक जबाबदारी या सर्व क्षेत्रांत शाखा सातत्याने नवनवीन पाऊले टाकत आहे. आज आपण आपल्या Accounting Museum द्वारे एक नवा अध्याय लिहिला आहे — जो ICAI च्या परंपरेला आणि जळगाव शाखेच्या प्रगतीला एकत्र जोडणारा ठरेल. आपल्या सर्व सदस्यांच्या, वरिष्ठ मार्गदर्शकांच्या सहकार्यामुळेच शाखा आज या उंचीवर पोहोचली आहे. WIRC चे नेतृत्व आम्हाला पुढील काळातही योग्य दिशादर्शन देईल, आणि आपण सर्व मिळून जळगाव शाखेला महाराष्ट्रातील अग्रगण्य शाखांमध्ये स्थान मिळवून देऊ. या भेटीमुळे नक्कीच शाखेच्या कार्यात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी सी.ए. फायनल व सी.ए. इंटरमिजीएट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचाही मुंबई डब्लू. आय. आर. सी. टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्याशी बोलताना तुम्ही केवळ परीक्षा पास केली नाही, तर तुम्ही The Institute of Chartered Accountants of India या संस्थेच्या ७५ वर्षांच्या नीतिमत्तेच्या आणि प्रामाणिकतेच्या परंपरेत प्रवेश केला आहे. ICAI ही फक्त एक संस्था नाही ती राष्ट्राच्या आर्थिक सद्सद्विवेकबुद्धीची शपथ आहे. आपण फक्त आकडे मोजत नाही, आपण विश्वासाचा हिशेब ठेवतो असे प्रतिपादन केले.
यानंतर ब्रांच नॉमिनी सी.ए. अभिषेक धामणे यांनी गेल्या काही वर्षांत शाखेने प्रगतीचा उत्कृष्ट मार्ग दाखवला आहे. ICAI ही संस्था केवळ लेखापरीक्षणाची व्यावसायिक संस्था नाही, तर ती देशाच्या आर्थिक पारदर्शकतेचा कणा आहे असे सांगून सर्व तरुण सीए व विद्यार्थ्यांना आपण आपल्या शाखेच्या माध्यमातून अधिक सक्रिय व्हा, WIRC च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा, आणि स्वतःला सतत ज्ञानवृद्ध करत राहा असे आवाहन केले.
मुंबई डब्लू. आय. आर. सी. विभागाचे कोषाध्यक्ष सी.ए. फेनिल शाह यांनी शाखेने गेल्या काही वर्षांत व्यावसायिक उपक्रम, सेमिनार्स, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, आणि सामाजिक उपक्रम या सर्व क्षेत्रांत आदर्श कामगिरी केली आहे.WIRC च्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पश्चिम भारतातील शाखांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि प्रत्येक सदस्यापर्यंत ज्ञान, नेटवर्किंग आणि संसाधने पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. असे मनोगत व्यक्त केले.
नंतर मुंबई डब्लू. आय. आर. सी. विभागाचे उपाध्यक्ष सी.ए. पियुष चांडक यांनी जळगाव शाखेत येण्याचा अनुभव अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी असुन या शाखेतील प्रत्येक उपक्रमात ऊर्जा, नवनिर्मिती आणि बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. येथे केवळ कार्यक्रम होत नाहीत, तर प्रत्येक उपक्रमामागे दृष्टी आणि भावना असते. ICAI आणि WIRC या दोन्ही संस्थांचा उद्देश फक्त व्यावसायिक विकास नाही, तर सदस्यांमधील सहकार्य, नेटवर्किंग आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करणे हाही आहे. WIRC स्तरावर आम्ही प्रत्येक शाखेशी अधिक जवळून कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजेच सदस्यांसाठी गुणवत्तापूर्ण CPE सत्रे, तांत्रिक साधने, आणि विद्यार्थ्यांसाठी नव्या शिक्षणपद्धती उपलब्ध करून देणे हा आमचा हेतू आहे असे सांगून जळगाव शाखेच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मुंबई डब्लू. आय. आर. सी. विभागाचे अध्यक्ष सी.ए. केतन सैया यांनी सकाळपासून राबविल्या गेलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून जळगाव शाखा केवळ व्यावसायिक कार्यापुरती मर्यादित नाही, तर समाजासाठी योगदान देणारी संस्था म्हणून कार्य करते असे मनोगत व्यक्त केले. व्यावसायिकतेसोबत सामाजिक बांधिलकी! हीच ICAI ची खरी ओळख आहे. आजचे युग बदलाचे आहे टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नवीन कायदे, या सर्व बदलांना सामोरे जाताना आपण आपल्या ज्ञानाला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच WIRC स्तरावर प्रत्येक शाखेला सक्षम बनविण्याचा संकल्प केला आहे. गुणवत्तापूर्ण CPE सत्रे, विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स, महिला सदस्यांसाठी विशेष उपक्रम आणि ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता यावर आम्ही सातत्याने काम करत आहोत असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी मुंबई डब्लु. आय. आर. सी. समिती सदस्यांची जळगाव सी. ए. शाखेच्या माजी अध्यक्षांसोबत चर्चात्मक बैठक पार पडली. तसेच या वेळी पत्रकार परिषदही भरविण्यात आली होती. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सी.ए. केतन सैया यांनी ICAI तर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची जसे की सभासद व विद्यार्थ्यांसाठी ए. आय. कोर्स, वित्तीय साक्षरता अभियान यामध्ये जीएसटी, इन्कम टॅक्स, सायबर फ्रॉड यावर केले जाणारे मार्गदर्शन तसेच WIRC तर्फे ट्रेन अर्न लर्न कोर्स, करिअर कॉन्सिलिंग प्रोग्राम हे उपक्रम राबविण्यात येतात अशी माहिती देऊन प्रत्येक शाळांमध्ये अकाउन्टीग म्युजिएम बसविण्यात यावे आणि प्रत्येक जिल्ह्यात सी.ए. विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली.
यानंतर शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात शारदा नेत्रालय संस्था व जळगाव सी.ए. शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. याचा लाभ १५०० विद्यार्थ्यांनी घेतला. यानंतर मुंबई डब्लु. आय. आर. सी. टीमने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सी.ए. लक्ष्मिकान्त लाहोटी यांनी केले.
