१ मार्च रोजी जळगाव येथे भव्य सोहळा;पद्मश्री पोपटराव पवार व मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव..
जळगाव,- दि.२५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
समाजाच्या तळागाळात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचा गौरव करण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान व जळगाव जनता सह.बैंक लि.यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “डॉ.आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार” यंदा कोल्हापूर येथील ज्येष्ठ समाजसेविका अनुराधा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच संस्थास्तरीय पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.या अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनीस जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांचे वितरण रविवार, दि. 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असल्याची माहिती केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर आणि जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी जळगाव जनता सहकारी बँक यांच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
निस्वार्थ सेवाभावाची दशकभराची परंपरा
“आपल्या समाजावर आईसारखं निस्वार्थ प्रेम करूया” या उदात्त विचारधारेतून प्रेरित होऊन थोर समाजसेवी डॉ.अविनाश आचार्य (दादा) यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवाकार्याची ज्योत पेटवली. त्या सेवाज्योतीने आज एका भव्य वटवृक्षाचे रूप धारण केले आहे.
सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,महिला सक्षमीकरण, तंत्रज्ञान, आर्थिक स्वावलंबन अशा विविध क्षेत्रांत केशवस्मृती सेवा संस्था समूह सातत्याने उपक्रम राबवित आहे.समाजातील वंचित,दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांसाठी निःशब्दपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा शोध घेऊन त्यांचा गौरव करणे हा या पुरस्कारामागील मुख्य हेतू आहे.
विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी कोणतेही अर्ज मागवले जात नाहीत. निवड समिती संबंधित व्यक्ती व संस्थांचे कार्य प्रत्यक्ष पाहून, सखोल अभ्यास करून आणि गुणवत्तेच्या आधारे निवड करते. त्यामुळे या पुरस्काराला सामाजिक क्षेत्रात विशेष मान्यता लाभली आहे.
२०१२-१३ पासून सुरू झालेल्या या पुरस्काराचे यंदा दहावे वर्ष आहे.गेल्या नऊ वर्षांत आरोग्यसेवा, बालहक्क, महिला सक्षमीकरण,मतिमंद व बहुविकलांगांचे पुनर्वसन, भटक्या-विमुक्त समाजाचा विकास,शेतकरी व ऊसतोड कामगारांच्या मुलांचे संगोपन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक सेवाव्रतींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.दहाव्या वर्षानिमित्त होणारा यंदाचा सोहळा अधिक व्यापक आणि प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
